मध्य प्रदेशच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याची तयारी जोरात सुरू झाली आहे. मोतीलाल नेहरू स्टेडियममध्ये तयारी करण्यात येत आहे. दोन हजार लोकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. मोठा स्टेज तयार केला जात आहे. जिथे दोन डझनहून अधिक प्रमुख नेते सहभागी होणार आहेत. येथील मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला भाजपाचे कार्यकर्ते आणि सामान्य जनताही मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचा अधिकृत कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. मात्र प्राथमिक माहितीनुसार, डॉ.मोहन यादव बुधवारी दुपारी १२ वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांसोबतच उपमुख्यमंत्री आणि काही मंत्रीही शपथ घेऊ शकतात. नवीन मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा झाल्यानंतर मोहन यादव यांनी राज्यपाल मंगूभाई पटेल यांची भेट घेतली आणि सरकार स्थापनेचा दावा केला. तत्पूर्वी शिवराज सिंह चौहान यांनी राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला.
रेड परेड ग्राउंडमध्ये तीन हेलिपॅड बांधले जात आहेत. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला अनेक केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी लाल परेडमध्ये तीन हेलिपॅड बांधले जात आहेत. वरिष्ठ नेत्यांचे हेलिकॉप्टर येथेच उतरणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर डॉ. मोहन यादव यांनी शिवराज सरकारचे काम पुढे नेण्याचे आश्वासन दिल्याचे सांगितले होते. यादव म्हणाले की, ते भाजपाचे सैनिक आहेत. भाजपा हा जगातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे, जो आपल्या कार्यकर्त्यांची काळजी घेतो.
कोण आहेत मोहन यादव?
मध्य प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री अर्थात मोहन यादव २०१३ मध्ये पहिल्यांदा उज्जैन दक्षिण मतदारसंघातून आमदार झाले. त्यानंतर २०१८ मध्ये पुन्हा एकदा त्यांनी आमदार होण्याचा मान पटकावला. २०२० मध्ये त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री करण्यात आले. यावेळी त्यांनी सलग तिसऱ्यांदा याच जागेवरून निवडणूक जिंकली. अशातच आता पक्षाने त्यांना मुख्यमंत्री करून राजकीय पंडितांना देखील धक्का दिला.