मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाची प्रशंसा केली आहे. मध्य प्रदेशमधील श्योपूर जिल्ह्यातील विजयपूर येथे लाडली बहन संमेलनामध्ये संबोधित करताना शिवराज सिंह चौहान म्हणाले की, देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ९ वर्षांच्या कार्यकाळामध्ये देशाने प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली आज भारत जगातील प्रमुख देश बनला आहे. पंतप्रधान मोदींनी श्योपूर जिल्ह्यातील कुनो येथे चित्ता प्रकल्पाची भेट दिली आहे.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की, मुख्यमंत्री लाडली बहना योजना आमच्या बहिणींचं जीवन बदलण्याची मोहीम आहे. योजनेमुळे त्यांना आत्मनिर्भरता मिळाली आहे. आता त्यांना माहेरी जाण्यासाठी पतीकडे पाहावे लागणार नाही. तसेच त्या त्यांच्या बहिणी मुलांच्या गरजा भागवण्यासाठी सक्षम असतील. या योजनेमध्ये देण्यात येणारी रक्कम टप्प्याटप्प्याने वाढवून तीन हजार रुपयांपर्यंत केली जाईल. सध्या महिलांना १२ हजार रुपये एक वर्षासाठी मिळतात. ते वाढवून ३६ हजार रुपये केले जातील.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की, पीएम किसान सन्मान निधीमध्ये केंद्र सरकार वार्षिक ६ हजार रुपये देत आहे. तर राज्य सरकार ४ हजार रुपये देत आहे. आता राज्य सरकार ही रक्कम वाढवून ६ हजार रुपये करत आहे. अशा प्रकारे शेतकऱ्यांना वर्षाला १२ हजार रुपये मिळतील. त्याचप्रकारे १२वीमध्ये ७० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप दिले जात आहेत. तर बारावीमध्ये टॉपर असणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना स्कूटी देण्यात येईल. ४ जुलै रोजी मुख्यमंत्री सिखो-कमाओ योजना लाँच करत आहे. त्यामध्ये विविध कंपन्या आणि फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या तरुणांना दरमहा ८ हजार रुपये स्टायपेंड दिलं जाईल.
लाडली लक्ष्मी योजना ही मुलींसाठी वरदान ठरली आहे. या योजनेनंतर राज्यामध्ये स्री-पुरुष गुणोत्तरामधील तफावत कमी झाली आहे. या योजनेमध्ये शासनाकडून मुलींना शिक्षणासाठी पूर्ण शुल्कासह प्रोत्साहनपर रक्कम दिली जात आहे, असेही शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले.