ज्योतिरादित्य शिंदेंना २ महिन्यात तिसरा धक्का! 'हा' बडा नेता लागला काँग्रेसच्या गळाला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 08:29 AM2023-08-10T08:29:25+5:302023-08-10T08:31:21+5:30
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे जवळचे नेते त्यांना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत.
मध्यप्रदेशमध्ये काही दिवसातच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेशमध्ये राजकीय वर्तुळात उलाढाली सुरू आहेत. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे जवळचे नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. आता त्यांचे कट्टर समर्थक असलेले रघुराज सिंह धाकड आज काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. ज्योतिरादित्य शिंदे समर्थक बैजनाथ सिंह यादव आणि राकेश गुप्ता यांच्यानंतर रघुराज सिंह धाकड यांच्या रूपाने शिंदे यांना मोठा धक्का बसणार आहे.
विश्वास की अविश्वास? आज होणार फैसला; जोरदार खडाजंगीने दुसऱ्या दिवशीही लोकसभेत तापले वातावरण
शिंदे समर्थक भारतीय जनता पक्षाचे राज्य कार्यसमिती सदस्य रघुराज सिंह धाकड, कोलारस विधानसभेचे धाकड समाजाचे भक्कम नेते, आज सकाळी ८ वाजता शेकडो वाहनांच्या ताफ्यासह भोपाळकडे रवाना होतील. भोपाळमधील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांच्या बंगल्यावर दिग्विजय सिंह जयवर्धन सिंह यांच्यासमोर कमलनाथ काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व घेतील.
बैजनाथ सिंह यादव आणि राकेश गुप्ता यांच्यासारखेच हेही मोठे नेते आहेत. रघुराजसिंह धाकड हे काँग्रेस पक्षाचे जुने नेते होते. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे ते शिंदे यांच्यासोबत भाजपमध्ये गेले. रघुराज धाकड यांनी काँग्रेस पक्षात किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, किसान काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस, खासदार प्रतिनिधी अशा अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.
रघुराजसिंह धाकड यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्या संदर्भात प्रतिक्रीया दिली आहे. धाकड म्हणाले की, भारतीय जनता पक्षात लक्ष नसल्याने त्यांना घरवापसी करावी लागली आहे. आपण मूळ काँग्रेसवासी होतो, पण शिंदेजी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेल्यामुळे महाराजांसह आम्ही भाजपमध्ये गेलो. मी गुरुवारी कमलनाथ यांच्यासमोर शेकडो कार्यकर्त्यांसह काँगेसमध्ये प्रवेश करत आहे.