कोण आहेत बालयोगी उमेशनाथ महाराज? भाजपाने दिली राज्यसभेची उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 02:28 PM2024-02-14T14:28:35+5:302024-02-14T14:29:35+5:30
उमेशनाथ महाराज काँग्रेस सरकारमध्ये दर्जाप्राप्त राज्यमंत्री होते.
RajyaSabha Election 2024 : येत्या 27 फेब्रुवारी रोजी राज्यसभानिवडणूक होणार आहे. यासाठी भारतीय जनता पक्षाने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपने जाहीर केलेल्या नावात उज्जैनच्या वाल्मिकी धामचे पीठाधीश्वर बालयोगी उमेशनाथ महाराज यांचेही नाव आहे. महाराजांना राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर उज्जैनच्या वाल्मिकी धाम येथे जल्लोषाचे वातावरण आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची गुरुवार शेवटची तारीख आहे. त्यामुळेच त्यांचे बुधवारी नाव जाहीर करण्यात आले आहे. धर्म आणि अध्यात्माशी निगडित बालयोगी उमेशनाथ महाराज यांचा राजकारणाशीही जुना संबंध आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्या सरकारमध्ये त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा होता. सिंह त्यांना आपले गुरुही मानतात.
BJP releases another list of candidates for the Rajya Sabha Biennial elections.
— ANI (@ANI) February 14, 2024
Union Minister L Murugan from Madhya Pradesh
Union Minister Ashwini Vaishnaw from Odisha pic.twitter.com/gE7m8geLCu
अमित शहा आणि संघ प्रमुखांच्या जवळचे
काँग्रेससोबतच बालयोगी उमेशनाथ महाराज हे भारतीय जनता पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाशीही जोडले गेले आहेत. संघप्रमुख मोहन भागवत असोत वा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उज्जैन या धार्मिक नगरीत आलेले कोणीही त्यांना भेटल्याशिवाय जात नाही. अशी माहिती आहे की, काँग्रेस नेते राहुल गांधी त्यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान वाल्मिकी धामला भेट देणार होते, परंतु काही कारणास्तव जाऊ शकले नाहीत.
राम मंदिराच्या भूमिपूजनात सहभागी
सिंहस्थादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उज्जैनला आले असता त्यांनी बालयोगी उमेशनाथ महाराज आणि इतर संतांची भेट घेतली होती. तसेच, उमेशनाथ महाराज मध्य प्रदेशातील एकमेव संत आहेत, ज्यांना श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाचे निमंत्रण मिळाले होते. काही दिवसांपूर्वी झालेल्या रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचेही त्यांना निमंत्रण होते.