भोपाळ : काय औकात आहे तुझी, असा ट्रकचालकाला उद्दाम प्रश्न विचारणारे मध्य प्रदेशातील शाजापूरचे जिल्हाधिकारी किशोर कन्याल यांना त्या पदावरून हटविण्यात आले आहे.
मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सांगितले की, अवमानकारक वक्तव्य आमचे सरकार अजिबात खपवून घेणार नाही. त्यामुळे यादव यांच्या आदेशावरून किशोर कन्याल यांना जिल्हाधिकारी पदावरून त्यांची बदली राज्याच्या उपसचिवपदावर करण्यात आली. नरसिंगपूरच्या जिल्हाधिकारी रिजू बाफना यांना शाजापूरच्या नव्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
नेमके काय झाले होते?शोर कन्याल यांनी ट्रकचालकांबरोबर एक बैठक घेतली. त्यात कन्याल यांनी सभ्य भाषेत बोलावे, असे ट्रकचालक संघटनेच्या एका प्रतिनिधीने सांगितले. त्यावर कन्याल भडकले. त्यांनी त्या प्रतिनिधीला विचारले की काय करणार तुम्ही? काय औकात आहे तुमची? ट्रकचालक व अन्य लोकांनी कायदा हातात घेऊ नये, असा इशाराही कन्याल यांनी दिला. या संभाषणाची व्हीडिओ क्लिप व्हायरल झाली होती.
कितीही मोठा अधिकारी असो..- वाहनचालकाच्या लायकीचा मुद्दा त्यांनी उपस्थित केल्यावर बैठकीला उपस्थित असलेल्या लोकांनी निषेध व्यक्त केला. - आपण काही तरी चुकीचे बोललो आहे याची जाणीव झाल्याने कन्याल यांनी दिलगिरी व्यक्त केली.- या प्रकाराबाबत मुख्यमंत्री यादव म्हणाले की, गरीब वर्गातील माणसांच्या उत्थानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सारेजण काम करत आहोत. - कितीही मोठा अधिकारी असला तरी त्याने आपल्या कामाबद्दल व गरिबांविषयी आदर बाळगला पाहिजे. कन्याल यांनी वापरलेली भाषा आमचे सरकार कधीही सहन करणार नाही.