भाेपाळ: भाजपने मध्य प्रदेश विधानसभेसाठी जाहीरनामा अद्याप प्रसिद्ध केलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र माेदींच्या संकल्पनेतून पक्षाचे ‘संकल्पपत्र’ तयार केले जाणार आहे. त्यात महिलांसाठी माेठ्या घाेषणा राहतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. ‘एमपीच्या मनात माेदी, माेदींच्या मनात एमपी’ या संकल्पनेवर आधारित संकल्पपत्र तयार करण्यात येत आहे. त्यात गरीब कल्याण, महिला सबलीकरण आणि तरुणांवर विशेष भर देण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. छत्तीसगड, मध्य प्रदेश व शेवटी राजस्थानचे संकल्पपत्र जाहीर हाेईल.
‘एआयएमआयएम’ निवडणूक रिंगणात
मतसंग्रामात ‘एआयएमआयएम’ पक्षानेही उडी घेतली आहे. पक्षाने बऱ्हाणपूर येथून माजी विराेधीपक्ष नेते नफीस मंशा यांना उमेदवारी दिली आहे. काॅंग्रेसने अल्पसंख्याक समुदायातून उमेदवारी न दिल्यामुळे ते नाराज हाेते.
अमित शाह यांनी दिला विजयाचा मंत्र
सागर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना ‘बूथ जिंका, निवडणूक जिंका, हा विजयाचा मंत्र दिला. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची खजुराहाे येथे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, भूपेंद्रसिंह यादव, वीरेंद्र खटीक इत्यादी नेते उपस्थित हाेते. शाह यांनी सागर भागातील २६ विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितले की, घराेघरी जा, लाेकांच्या भावना जाणून घ्या. तिकीट न मिळाल्यामुळे काेणीही नाराज नाही. एक-दाेन दिवसांचा प्रश्न आहे. सर्वांची नाराजी दूर हाेईल. एकत्रपणे पक्षासाठी काम करु, असे शाह यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना सांगितले.
‘जातिनिहाय जनगणनेचा काॅंग्रेसला फायदा नाही’
जातिनिहाय जनगणनेची मागणी केल्यामुळे काॅंग्रेसला निवडणुकीत काेणताही फायदा हाेणार नाही, असा दावा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला. या पक्षाने सत्तेत असताना कधीही अशी जनगणना केली नाही, हे जनता जाणून आहे. केवळ ओबीसी नव्हे, तर सर्वच जातीच्या लाेकांची जनगणना व्हायला हवी, असेही आठवले म्हणाले.