सरदार वल्लभाई पटेलांचा पुतळा ट्रॅक्टरने पाडला; दोन गटांत दगडफेक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 03:27 PM2024-01-25T15:27:32+5:302024-01-25T15:28:42+5:30
माकडोनच्या मंडी गेटवर पुतळा उभारण्याचा वाद गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे
मध्य प्रदेशच्याउज्जैनमध्ये देशाचे माजी संरक्षणमंत्री सरदार वल्लभाई पटेल यांचा पुतळा पाडण्यात आल्यामुळे तणाव निर्माण झाला आहे. यावेळी, दोन समुदायांमध्ये दगडफेक झाल्याची घटना घडली. उज्जैनमधील माकडोन येथे २४ जानेवारी बुधवारी रात्री ट्रॅक्टर लावून सरदार वल्लभाई पटेल यांचा पुतळा जमिनीवर पाडण्यात आला. काहीजण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा लावू इच्छित होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
उज्जैनच्या माकडोन येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यावर ट्रॅक्टर चालवण्यात आल्याने दोन गटांत चांगलीच जुंपली. त्यावेळी, दोन्ही गट आमने-सामने आल्याने दगडफेकही झाली. त्यामध्ये, स्थानिक दुकानदारांचे नुकसान झाले असून गोंधळ निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच उज्जैनचे एडिशनल एसपी नितेश भार्गव यांनी पोलीस पथकांसह घटनास्थली धाव घेतली.
दरम्यान, माकडोनच्या मंडी गेटवर पुतळा उभारण्याचा वाद गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. पोलीस अधीक्षक सचिन शर्मा यांनी सांगितले की, याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. घटनास्थळी पोलीस पथक तैनात करण्यात आले असून आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.