धक्कादायक; सातपुडा व्याघ्र प्रकल्पात वाघाडी हत्या, मुंडके आणि हात-पाय कापून नेले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 01:35 PM2023-06-30T13:35:14+5:302023-06-30T13:35:43+5:30
Satpura Tiger Reserve: ही घटना समोर आल्यानंतर आरोपींना पकडण्यासाठी पथके रवाना झाली आहेत.
Satpura Tiger Reserve:वाघांचे घर म्हटल्या जाणाऱ्या सातपुडा व्याघ्र प्रकल्पाच्या (STR) कोअर एरियातून वाघाच्या हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिकाऱ्यांनी वाघाचा शिरच्छेद करुन त्याचे शिर सोबत नेल्याचा प्रकार घडलाय. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर वनविभागात एकच खळबळ उडाली आहे. STR ATF आणि टायगर स्ट्राइक फोर्स शिकाऱ्यांचा शोध घेत आहेत.
मध्य प्रदेशातील सर्वाधिक(50 हून अधिक) वाघ सातपुड्यात वास्तव्यास आहेत. वाघाच्या शिकारीची घटना आठवडाभर जुनी आहे. 26 जून रोजी चुर्णा येथील डबरादेव बीटमध्ये वाघाचा मृतदेह गस्ती पथकाला आढळून आल्याची माहिती एसटीआरकडून देण्यात आली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाण्याच्या डबक्याजवळ वाघाचा मृतदेह आढळला. त्याचे शिर आणि शरीराचे काही भाग गायब होते.
पोस्टमॉर्टमनंतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वाघाचा मृतदेह जाळण्यात आला आहे. काही जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे. शिकाऱ्यांना पकडण्यासाठी पथके रवाना झाली आहेत. सातपुडा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक नर्मदापुरम एल कृष्णमूर्ती यांनी सांगितले की, वाघाच्या शिरासह हातपायही कापले आहेत.