आपल्या भारतमातेसाठी प्राण देणाऱ्या शूर वीरांच्या यादीत आणखी एका जवानाच्या नावाची नोंद झाली आहे. मध्य प्रदेशातील जवान शहीद झाल्यानंतर अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी उसळली. लेह-लडाखमध्ये शहीद झालेल्या शालिकराम यादव या जवानाचे पार्थिव शुक्रवारी त्याच्या मूळ गावी आणण्यात आले. जवानाचे पार्थिव गावात पोहोचताच अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी झाली. लडाखमधील लेह येथे झालेल्या अपघातात छतरपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या लष्करी जवानाचा मृत्यू झाला होता.
जवान यादव हे मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील लवकुश नगर येथील सूरजूर भागातील बच्चोन भागातील रहिवासी होते. ते लेह लडाखमध्ये जाट रेजिमेंटमध्ये तैनात होते. २३ एप्रिल रोजी लष्कराच्या ट्रकचा भीषण अपघात झाला. ज्यात शालिकराम यादव हे देखील कर्तव्यावर होते. शालिकराम यादव यांच्या पार्थिवावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना गॉड ऑफ ऑनरही देण्यात आला.
६ महिन्यांचा लेक पोरका झालादरम्यान, २३ एप्रिल रोजी शालिकराम यादव हे जाट रेजिमेंटच्या इतर जवानांसोबत ट्रकमध्ये बसले होते. त्यानंतर कर्तव्यावर असताना लष्कराचा ट्रक खड्ड्यात पडला आणि ते या अपघातात शहीद झाले. घटनेची माहिती तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले. शालिकराम यादव यांना जवळच्या लष्करी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. माहितीनुसार, शालिकराम यादव यांचा विवाह सुप्रिया यादव यांच्यासोबत दोन वर्षांपूर्वी झाला होता, त्यांना ६ महिन्यांचा एक मुलगा असून, अनुभव यादव असे त्याचे नाव आहे.
शालिकराम यांच्या वडिलांचे आजारामुळे निधन झाले होते. आता त्यांच्या पश्चात त्यांना दोन भाऊ, आई, पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. शालिकराम जवळपास एक महिना रजेवर राहिल्यानंतर गेल्या महिन्यातच ड्युटीवर परतले होते, असे त्यांचे भाऊ बट्टू यादव यांनी सांगितले. शालिकराम यांची २०१७ मध्ये लडाखमध्ये पोस्टिंग झाली होती.