२३ वर्षीय शिवानीचा भगवान श्रीकृष्णासोबत विवाह
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 09:53 AM2024-03-27T09:53:23+5:302024-03-27T09:53:38+5:30
२३ वर्षीय बी. कॉम. पास शिवानी परिहार भगवान लड्डू गोपालसोबत विवाह करणार आहे.
ग्वाल्हेर : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये शिकणारी एक महाविद्यालयीन विद्यार्थिनी लवकरच एका अनोख्या लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. हा विवाह कोणा व्यक्तीसोबत नसून भगवान श्रीकृष्णासोबत होत आहे.
२३ वर्षीय बी. कॉम. पास शिवानी परिहार भगवान लड्डू गोपालसोबत विवाह करणार आहे. १७ एप्रिल रोजी वृंदावन येथून लग्नाची मिरवणूक ग्वाल्हेरला येणार असून, विवाह सोहळा पार पडणार आहे. स्वागतापासून निरोप देण्यापर्यंतचे विधी थाटामाटात साजरे करण्यासाठी कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.
लग्न करेन तर श्रीकृष्णाशीच...
शिवानी सर्व विद्यार्थिनींपेक्षा वेगळी आहे, असे तिच्या आई-वडिलांनी सांगितले. लहानपणापासूनच शिवानीला श्रीकृष्णांप्रती भक्तीची खूप भावना होती. तरुण झाल्यावर तिने ठरवले की, ती फक्त भगवान श्रीकृष्णाशीच लग्न करेल. सुरुवातीला पालकही यासाठी तयार नव्हते; पण मुलीची जिद्द आणि भक्तीमुळे आई-वडिलांनी याला होकार दिला.
जीवनाचे अंतिम ध्येय मोक्ष
शिवानीचे वडील राम प्रताप परिहार सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. परिहार यांना दोन मुली आहेत. मोठ्या मुलीचे लग्न झाले आहे. शिवानी म्हणते की, जीवनाचे अंतिम ध्येय मोक्ष आहे आणि त्यासाठी तिला श्रीकृष्णांशी लग्न करायचे असून, आयुष्य भक्तीमध्ये घालवायचे आहे.
पत्रिका छापल्या
शिवानीचा लग्नसोहळा १५ एप्रिल रोजी सुरू होईल. यात हळद, तेल यांसह विविध कार्यक्रम होतील. लग्न कॅन्सर हिल भागातील एका मंदिरात धार्मिक विधींनी होईल.
शिवानी श्रीकृष्णांसह वृंदावनला रवाना होईल आणि तेथे गीतेचा अभ्यास करेल. या विवाहासाठी जवळपास १०० पेक्षा अधिक जणांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून, पत्रिकाही छापण्यात आल्या आहेत.