भोपाळ : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान रविवारी भोपाळमध्ये ब्राह्मण महाकुंभमध्ये सहभागी झाले होते. यावेळी शिवराज चौहान यांनी मोठी घोषणा केली. ज्या मंदिरांकडे शेतजमीन नाही. तेथील पुजाऱ्यांना दरमहा 5 हजार रुपये दिले जाणार आहेत. तसेच, भगवान परशुराम जयंतीच्या दिवशी मध्य प्रदेशात सरकारी सुट्टी असणार आहे, असे शिवराज चौहान यांनी सांगितले.
यासोबतच संस्कृत शाळेतील इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना 8 हजार रुपये, इयत्ता 6 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांना 10 हजार रुपये दिले जातील, असे शिवराज चौहान यांनी सांगितले. तसेच, या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, भाषा, साहित्य, भूगोल, विज्ञान, राजकारण, ज्योतिष, अर्थशास्त्र किंवा गणित असो, ब्राह्मणांकडून अशी एकही विद्या अस्पर्शित झाली नाही.
मध्य प्रदेश सरकारच्या प्रेस नोटनुसार, मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी प्रश्न विचारला की दंड पाणिनी, आर्यभट्ट, वराह मिहीर, नव्या पिढीला ज्ञानाचा प्रकाश कोणी दिला..? जेव्हा जगाने शोध सुरू केले नव्हते. तेव्हा ब्राह्मणानेही शून्य दिले होते. मग ते धर्म असो, युद्धशास्त्र असो की शस्त्रास्त्रे. दिशा आणि ज्ञान देण्याचे काम गुरू करत होते, असे शिवराज चौहान म्हणाले.
जो इंद्रियांवर विजय मिळवतो आणि जो स्वतःच्या ज्ञानाने ईश्वराचे सत्य जाणतो, तो ब्राह्मण आहे. ज्ञान ज्याचा आदर, आदर ज्याचा धर्म, दया ज्याचे अंतःकरण, ज्ञान ज्याचे राज्य तोच ब्राह्मण आहे, असे शिवराज चौहान म्हणाले. तसेच, मध्य प्रदेशात प्रेम चालू शकते पण जिहाद कोणत्याही किंमतीत चालू देणार नाही. असे कृत्य करणाऱ्यांचा समूळ नाश होईल, असे आश्वासन शिवराज चौहान यांनी जनतेला दिले.
याशिवाय, मध्य प्रदेशच्या भूमीवर असे प्रकार होऊ देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. यादरम्यान मंदिराच्या जमिनीचा जिल्हाधिकारी लिलाव करतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी मंदिराच्या कोणत्याही जमिनीचा लिलाव करणार नाहीत, फक्त पुजारीच लिलाव करतील, असा निर्णयही आम्ही घेतला आहे, असे शिवराज चौहान यांनी सांगितले.