मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील लाल परेड मैदानावर आज डॉ. मोहन यादव यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. डॉ. मोहन यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यपाल मंगूभाई यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
मोहन यादव यांच्या शपथविधी सोहळ्याला देशातील अनेक राजकीय दिग्गज मंचावर उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेते मंचावर उपस्थित होते.
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये बुधवारी दुपारी वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. नवे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहून मोतीलाल नेहरू स्टेडियमबाहेर आलेले माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना हजारोंच्या गर्दीने वेढले होते. 'मामा-मामा' म्हणणारे लोक शिवराज सिंह चौहान यांना भेटण्यासाठी प्रयत्न करत होते. यावेळी शिवाराज सिंह चौहान यांनी गाडीचा वेग कमी करत लोकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. शिवराज यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर काल काही महिलाही त्यांना भेटण्यासाठी आल्या होत्या. यावेळी ती ढसाढसा रडू लागल्याचे दिसून आले.
कोण आहेत मोहन यादव?
मध्य प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री अर्थात मोहन यादव २०१३ मध्ये पहिल्यांदा उज्जैन दक्षिण मतदारसंघातून आमदार झाले. त्यानंतर २०१८ मध्ये पुन्हा एकदा त्यांनी आमदार होण्याचा मान पटकावला. २०२० मध्ये त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री करण्यात आले. यावेळी त्यांनी सलग तिसऱ्यांदा याच जागेवरून निवडणूक जिंकली. अशातच आता पक्षाने त्यांना मुख्यमंत्री करून राजकीय पंडितांना देखील धक्का दिला.