मध्य प्रदेशातील सिधी येथील लघुशंकेच्या घटनेतील पीडित व्यक्तीची मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गुरुवारी सकाळी भेट घेतली. यावेळी शिवराज सिंह चौहान यांनी पीडित व्यक्तीची माफी मागितली. एवढेच नाही तर त्यांनी त्या व्यक्तीचे पाय धुवून दु:खही व्यक्त केले आहे. अलीकडेच माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना मध्य प्रदेशातील सिधीमध्ये समोर आली. या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये प्रवेश शुक्ला नावाच्या व्यक्तीने एका आदिवासी व्यक्तीवर लघुशंका केली होती.
दशमत असे या आदिवासी पीडित व्यक्तीचे नाव आहे. गुरुवारी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दशमत यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या घटनेबद्दल माफी मागितली आणि त्यांचे पाय धुतले. तसेच, या घनटेमुळे मन खूल दुखावल्याचे शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले. याचबरोबर, शिवराज सिंह चौहान यांनी दशमत यांच्याकडून त्यांच्या कुटुंबीयांचीही माहिती घेतली. तसेच, दशमत हे सुदामा असल्याचे सांगत शिवराज सिंह चौहान यांनी स्वत:ला त्यांचे मित्र असल्याचे म्हटले आहे.
शिवराज सिंह चौहान यांनी दशमत यांच्या कुटुंबाला सरकारच्या योजनांमधून काय लाभ मिळत आहेत, याबद्दल चर्चा केली. तसेच जेव्हा तुम्हाला कशाचीही गरज असेल तेव्हा तुम्ही मला सांगा, असे शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले. तसेच, शिवराज सिंह चौहान म्हणाले की, गुन्हेगाराला कोणताही धर्म, पक्ष, जात नसते. त्यामुळेच दोषीवर कठोर कारवाई करण्यात आली असून, मी सर्वांना आवाहन करतो की, कोणाशीही भेदभाव करू नका.
दरम्यान, प्रवेश शुक्ला या व्यक्तीने दशमत यांच्यावर लघुशंका केली होती. या घटनेचा ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर सोशल मिडियावर संताप व्यक्त केला जात होता. याप्रकरणी मंगळवारी रात्री प्रवेश शुक्ला याला अटक करण्यात आली. तसेच, प्रवेश शुक्लावर कलम 294, 594 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच एससी-एसटी कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढेच नाही तर शिवराज सिंह चौहान यांनी आरोपी प्रवेश शुक्लावर एनएसए लावण्याचे आदेशही दिले होते.