धक्कादायक! मुलगी न झाल्याने संताप; पित्याकडून १२ दिवसांच्या मुलाचा खून
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 04:07 PM2024-01-15T16:07:47+5:302024-01-15T16:09:09+5:30
भोपाळ - मुलगा हा वंशाचा दिवा असतो, त्यामुळे मुलाच्या जन्मानसाठी प्रत्येक कुटुंबाचा आग्रह असतो. त्यातून, भारतात स्त्री भ्रूण हत्येच्या ...
भोपाळ - मुलगा हा वंशाचा दिवा असतो, त्यामुळे मुलाच्या जन्मानसाठी प्रत्येक कुटुंबाचा आग्रह असतो. त्यातून, भारतात स्त्री भ्रूण हत्येच्या बहुतांश घटना घडल्या आहेत. आजही समाजात मुलगी नको, मुलगाच हवा.. असा काहींचा समज असल्याचं पाहायला मिळते. त्यातूनच गर्भलिंगनिदान व स्त्रीभ्रूणहत्येच्या घटना घडतात. तर, स्त्री जन्माचे स्वागतही अनेक कुटुंबात मोठ्या जल्लोषात केल्याचं पाहायला मिळत आहे. अलीकडे समाजाची मानसिकता बदलली असून मुलींच्या जन्माचे स्वागत उत्साहात व आनंदात होत असल्याचं दिसून येतं. मात्र, मुलगी न झाल्याने एका पित्याने चक्क नवजात मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
मध्य प्रदेशच्या बैतुल जिल्ह्यातील ही धक्कादायक घटना असून दारुच्या नशेत वडिलांनी जन्मलेल्या बाळाचा खून केला. कोतवाली तालुक्यातील बज्जारवाड गावात रविवारी संध्याकाळी ही घटना घडली. मुलगी न झाल्यामुळे निराश झालेल्या बापाने हे निर्दयी कृत्य केलं. या व्यक्तीला यापूर्वीच दोन मुले असून तिसऱ्या वेळेस आपणास मुलगी व्हावी, अशी त्याची इच्छा होती.
अनिल उईके असे या निर्दयी बापाचे नाव असून त्याने आपल्या पत्नीलाही मारहाण केली. मुलाच्या जन्मानंतर राग अनावर झालेल्या अनिलने पत्नीला मारहाण करत, तिच्याकडून आपल्या १२ दिवसांच्या मुलाला ओढून घेतले. पतीचा हा अवतार पाहून पत्नी घरातून बाहेर निघून गेली होती. मात्र, काही वेळानंतर घरात आल्यावर तिने पाहिले असता, तिचा लहान मुलगा मृतावस्थेत आढळून आला, अशी माहिती फिर्यादीच्यावतीने पोलिसात दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, लहान बाळाच्या गळ्याभोवती हाताच्या बोटाचे निशाण दिसून येत आहेत. याप्रकरणी, पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच, आरोपी अनिल उईके यास अटकही करण्यात आली आहे.