केंद्रीयमंत्री आणि भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पुन्हा एकदा काँग्रेस पक्षातीलन नेतृत्त्वार टीका करत आपण काँग्रेस का सोडली यामागील राजकारण सांगितलं. इंडिया इकॉनॉमिक्स कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना त्यांनी काँग्रेस पक्षात होत असलेल्या अवमानावर भाष्य केलं. आत्मसन्मानाला ठेस पोहोचल्यामुळेच आपण काँग्रेसमधून बाहेर पडलो. मी कधीही कुठल्या पदाची अपेक्षा केली नव्हती, कधीही खुर्चीसाठी, पदासाठी अडून बसलो नव्हतो, असेही ज्योतिरादित्य यांनी स्पष्ट केले.
ज्योतिरादित्य शिंदेंनी काही दिवसांपूर्वी आपल्या ट्विटर अकाऊंटवरील बायोमधून भाजपचं चिन्ह हटवलं होतं. त्यानंतर, काँग्रेस नेत्यांकडून ज्योतिरादित्य शिंदेंवर निशाणा साधण्यात आला होता. काँग्रेस नेते पवन खेडा यांनी अप्रत्यक्षपणे ज्योतिरादित्य शिंदे यांना टोला लगावत, पुन्हा काँग्रेसमध्ये परत येण्यासाठी नजर कशी मिळवू, असे म्हणत चिमटा काढला होता. त्यावर, ज्योतिरादित्य यांनी प्रत्युत्तरही दिलं. मध्य प्रदेशात काँग्रेस पक्षाजवळ कुठलाही मुद्दा नाही, म्हणूनच, सकाळ-संध्याकाळ केवळ खोटं पसरवणे हाच उद्योग आहे, माझ्या ट्विटर बायोवर लक्ष देण्याऐवजी लोकांच्या मन की बात ओळखली असती, तर १५ महिन्यांत भ्रष्ट सरकार पडलं नसतं, असं प्रत्युत्तर शिंदे यांनी दिलं होतं. आता, पुन्हा एकदा शिंदेंनी काँग्रेस नेत्यांवर प्रहार केला आहे.
एका कार्यक्रमात बोलताना आपण काँग्रेस का सोडली, हे सांगताना ज्योतिरादित्य यांचे हावभाव बदलले. मी कधीही मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीमागे धावलो नाही, किंवा सीएम पदासाठी काँग्रेसपुढे कधी कुठली अट घातली नाही. मात्र, काँग्रेसने आपल्या आत्मसन्मानाला ठेस पोहोचवली. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी खुर्चीवर बसून त्यांचा अपमान केला. मी कधीही पद देण्याची विचारणा केली नाही, पण आत्मसन्मानाला ठेस पोहचू देण्याचं काम केलं नाही. मात्र, जेव्हा इथ ठेस पोहोचली, तेव्हा आपण काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतल्याचं शिंदे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे, ट्विटर बायोवरुन बीजेपीचा चिन्ह हटवल्याने होत असलेल्या चर्चांना काहीही महत्त्व नसल्याचं त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितलं.