डंपरमधून माती ओतली, दोन महिलांना जिवंत पुरण्याचा प्रयत्न, तिघांविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2024 23:21 IST2024-07-21T23:20:56+5:302024-07-21T23:21:48+5:30
Madhya Pradesh Crime News: मध्य प्रदेशमधील रीवा येथे दोन महिलांना जिवंत पुरण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

डंपरमधून माती ओतली, दोन महिलांना जिवंत पुरण्याचा प्रयत्न, तिघांविरोधात गुन्हा दाखल
मध्य प्रदेशमधील रीवा येथे दोन महिलांना जिवंत पुरण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये डंपरचालक प्रदीप कोल, पीडित महिलांचा सासरा गोकरण पांडेय आणि दीर विपिन पांडेय यांचा समावेश आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून दोन आरोपी फरार आहेत.
याबाबत पोलीस अधीक्षक विवेक सिंह यांनी सांगितले की, कौटुंबिक वादातून ही घटना घडली आहे. या प्रकरणी वापरण्यात आलेला डंपर जप्त करण्यात आला आहे. तसेच आरोपी विपिन पांडेय याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर दोन इतर आरोपींचा शोध सुरू आहे. तर पीडित महिलांवर रुग्णालयात उपचार करुन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
हिनौता कोठार येथे जमिनीच्या वादातून झालेल्या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल होत होता. त्याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, फिर्यादी सुरेश पांडेय यांच्या पत्नी आशा पांडेय यांनी पोलिसांना सांगितलं की, त्यांचे कुटुंबातील एक सासरे गौकरण पांडेय यांच्यासोबत सामाईक जमिनीमधून रस्ता काढण्यावरून वाद सुरू आहे. शनिवारी दुपारी दोन वाजता गौकरण पांडेय आणि दीर विपिन पांडेय वादग्रस्त जमिनीवर रस्ता बनवण्यासाठी डंपरमधून मुरुम घेऊन आले. त्यानंतर आशा पांडेय यांना जाऊ ममता पांडेय हिच्यासोबत जाऊन डंपरचालकाला त्या जागेत मुरूम ओतण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला.
मात्र डंपरचालकानं त्यांचं म्हणणं ऐकलं नाही. त्याने डंपरमधून मुरूम ओतण्यास सुरुवात केली. त्यामुळे दोघीही मुरुमाखाली गाडल्या जाऊ लागल्या. तेवढ्यात ग्रामस्थांनी तिथे धाव घेत त्यांना मुरुमाखालून बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले.