मध्य प्रदेशमधील भाजपा आमदार प्रदीप पटेल यांनी ग्रामस्थांना दिलेल्या अजब आदेशाची चर्चा सध्या सुरू आहे. आता त्यांनी दिलेल्या या आदेशाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मऊगंजमधील भाजपा आमदार प्रदीप पचेल यांच्या जनता दरबारामध्ये एक विनंती अर्ज आला होता. मात्र आमदार महोदयांनी तो विनंती अर्ज धुडकावून लावत उलट ग्रामस्थांनाच शिक्षा दिली. शिक्षेचं कारण दुसरं तिसरं काही नाही तर गुटखा आणि तंबाखू ठरले.
त्याचं झालं असं की, एक तरुण गावातील अनियमित वीजपुरवठा आणि खराब ट्रान्सफॉर्मरची तक्रार घेऊन आमदार प्रदीप पटेल यांच्या जनता दरबारामध्ये आला होता. आमदार महोदयांकडे आला तेव्हा तो गुटखा खात होता. हे पाहून आमदार महोदय भडकले.
त्यांनी तरुणाच्या आईला फोन करून खुशाली विचारली. त्यानंतर सदर तरुण कधीपासून गुटखा खात आहे याबाबत विचारले. तसेच तुम्ही त्याला गुटखा खाऊ नको, असं का सांगत नाही, असंही विचारलं. तेव्हा त्या तरुणाच्या आईने तुम्हीच आता त्याला समजवा, असं सांगितलं. हे ऐकताच आमदार महोदयांनी हा तरुण जोपर्यंत गुटखा खाणं सोडत नाही, तोपर्यंत गावात ट्रान्सफॉर्मर लागणार नाही, असे फर्मान सुनावले.