मध्य प्रदेशमधील मुरैना जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील अंबाह येथे रील्स बनवण्याच्या नादात एका सातवीतील मुलाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. रील्स बनवण्यासाठी हा मुलगा गळफास घेतल्यांचा अभिनय करत होता, मात्र त्याचा खरोखरच फास लागून मृत्यू झाला. या घटनेचा लाईव्ह व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये हा तरुण मित्रांसोबत मिळून फासावर लटकण्याचा अभिनय करत होता. तर त्याचे मित्र मोबाईलवर त्याचं शूटिंग करत होते. तेवढ्यात या मुलाचा पाय घसरला आणि फास लागून त्याचा जीव गेला.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार स्वत:च्या घरासमोरील रिकाम्या असलेल्या जागेत करण परमार हा सातवीत शिकत असलेला विद्यार्थी मित्रांसोबत खेळत होता. करणला अचानक रील्स बनवण्याची लहर आली. त्याने मित्रांना मोबाईलवर व्हिडीओ शूटिंग करण्यास सांगितलं. त्यानंतर एका झाडाला फास लावून तो गळफास लावल्याचा अभिनय करू लागला. मात्र तेवढ्यात त्याचा पाय निसटून दुर्घटना घडली.
व्हिडीओ बनवत असलेल्या त्याच्या मित्रांना तो कदाचित अभिनय करतोय, असं वाटलं. मात्र याचदरम्यान, त्याचा श्वास गुदमरला आणि तो तडफडू लागला. तेव्हा मित्रांनाही काहीतरी गडबड झाल्याचं लक्षात आलं. त्यांनी त्याचा गळफास सोडवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना तो फास सोडवता आला नाही. बघता बघता करण बेशुद्ध पडला.
करणची ती अवस्था पाहून त्याचे मित्र घाबरले. काहीच हालचाल होत नसल्याचे लक्षात आल्यावर ते करणला तिथेच सोडून पळून गेले. व्हिडीओ बनवत असलेला मुलगाही तिथून पळाला. घटनेची माहिती मिळताच करणचे कुटुंबीय तिथे पोहोचले. त्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. आता पोलीस या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत.