Lok Sabha Election 2024 PM Modi Vs Rahul Gandhi: २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेची निवडणुकीसाठी सर्वच पक्षांच्या तयारीला हळूहळू वेग येताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला चितपट करण्यासाठी विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर केले जात आहे. बिहारमधील पाटण्यानंतर आता विरोधी पक्षांच्या नेत्यांची दुसरी बैठक होणार आहे. मात्र, यातच आता २०२४ मध्ये काँग्रेसची वाट खडतर असेल. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नरेंद्र मोदी हेच पुढे असतील. राहुल गांधी चितपट होऊ शकतील, असा दावा एका सर्व्हेतून करण्यात आला आहे.
पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्र सरकारांच्या कामगिरीच्या नावावर मते मागणार आहेत. दुसरीकडे, विरोधक सरकारचा कमकुवतपणा आणि चुकीची धोरणे सांगून जनतेमध्ये जातील, असे म्हटले जात आहे. विरोधकांची मोट बांधण्याचे प्रयत्न होत असले तरी विरोधी गट विखुरलेला असल्याचे सांगितले जात आहे. एक मोठा निवडणूकपूर्व सर्व्हे समोर आला आहे. त्याचे परिणाम धक्कादायक आहेत. मध्य प्रदेशात हा सर्व्हे घेण्यात आला आहे.
५७ टक्के लोकांना पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीच हवेत
पंतप्रधानपदासाठी सर्वात आवडता उमेदवार कोण, असा प्रश्न लोकांना विचारण्यात आला. या प्रश्नाच्या उत्तरात ५७ टक्के लोकांनी नरेंद्र मोदींचे नाव घेतले. त्याच वेळी, १८ टक्के लोकांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना त्यांची पसंती असल्याचे सांगितले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या समर्थनार्थ ८ टक्के तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या समर्थनार्थ ३ टक्के लोकांनी मत व्यक्त केले. तर १४ टक्के लोक अन्य नेत्यांच्या समर्थनात होते.
राहुल गांधींना पंतप्रधान म्हणून २९ टक्के लोकांची पसंती
सर्वेक्षणात सहभागी झालेल्या लोकांना नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यामध्ये थेट पंतप्रधान म्हणून कोणाला निवडायला आवडेल, असे विचारण्यात आले. यामध्ये ६८ टक्के लोकांनी नरेंद्र मोदींच्या समर्थनार्थ आणि २९ टक्के लोकांनी राहुल गांधींच्या समर्थनार्थ मतदान केले. तीन टक्के लोक तटस्थ राहिले. त्यांनी कोणाच्याच बाजूने मत दिले नाही, असे सर्व्हेत म्हटले आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीपूर्वी मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होऊ शकतात. मध्य प्रदेशात जिथे भाजप मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली सत्ता वाचवण्यासाठी लढत आहे. दुसरीकडे, काँग्रेस आपले प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजपला सत्तेतून बेदखल करण्यासाठी प्रयत्नशील आहे. या लढ्याचे फलित काय? याचा फायदा राजकीय पक्षांना निवडणुकीत मिळतो की नाही, हे निवडणूक निकालच सांगतील, असे म्हटले जात आहे.