भोपाळ - मध्य प्रदेशच्या गुना जिल्ह्यात ऊर्जा विभागातील सहायक व्यवस्थापकांसोबत गैरव्यवहार करणे वन विभागाच्या उप विभागीय अधिकाऱ्यास चांगलेच महागात पडले आहे. दोघांमधील घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एसडीओ सुरेश अहिवार यांच्यावरील कारवाईचे पत्र भोपाळ मुख्यालयास पाठवण्यात आलं आहे. बमोरी वन विभागाच्या कार्यालयाची आणि निवासस्थानाची वीज कपात केल्यामुळे सुरेश अहिवार नाराज झाले होते. त्यातून, त्यांनी दारुच्या नशेत ऊर्जा विभागातील सहायक व्यवस्थापकांच्या निवासस्थानी जाऊन राडा केल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता.
अहिवार यांनी ऊर्जा विभागाचे अधिकारी पियुष कुमार यांना जीवे मारण्याची धमकी देत तेथील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व मारहाण करण्यात आली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियातून समोर आला. त्यामध्ये, वन विभागाचे अधिकारी सुरेश अहिवार हे स्वत:ला देव असल्याचे सांगताना दिसून येत आहे. याप्रकरणी डीएफओ अक्षय राठोड यांनी सुरेश अहिवार यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे लेखी निवेदन दिले आहे. राठोड यांच्या निवेदनाची गंभीर दखल घेतक राज्य शासनाने सुरेश अहिवार यांच्याव निलंबनाची कारवाई केली आहे.
मध्य प्रदेश नागरी सेवा (व्यवहार) अधिनियम १९६५ अंतर्गत सुरेश अहिवार यांना दोषी मानून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच, भोपाळ मुख्यालयास ते कळवण्यात आलं आहे. याप्रकरणी सुरेश अहिवार यांनी आपली बाजू मांडताना, आपणासककडून वीज वितरण विभागाची १ लाख १२ हजार रुपयांची थकबाकी जमा करण्यात आली होती. मात्र, तरीही विभागाने वीज कपात केल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान, ऊर्जा विभागाचे अधिकारी पियुष कुमार यांनी त्यांच्या निवासस्थानी महिला कर्मचाऱ्याशी गैरव्यवहार केला. त्यामुळे, त्यांच्याविरुद्धही पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे.