मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर येथे दिवसाढवळ्या झालेल्या विद्यार्थिनीच्या अपहरणामुळे खळबळ उडाली होती. त्यानंतर अपहृत मुलीची शोध घेण्यासाठी पोलिसांनी यंत्रणा कामाला लावली होती. दरम्यान, या अपहरण प्रकरणामध्ये पोलिसांना तपासात मोठं यश मिळालं आहे. ज्या तरुणीचं अपहरण झालं होतं तिला गुना येथील एका हॉटेलमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्या तरुणाने या मुलीचं अपहरण केलं होतं, तोही तिच्यासोबत या हॉटेलमध्ये सापडला.
ग्वाल्हेर येथील चंद्रबदनी नाका पेट्रोलपंपावरून एखा तरुणीचं अपहरण करण्यात आलं होतं. अपहरणकर्त्यांनी तरुणीचं दिवसाढवळ्या अपहरण करून तिला दुचाकीवरून आपल्यासोबत नेलं होतं. या दरम्यान, ही तरुणी मदतीसाठी आरडाओरडा करताना दिसली होती.
या खळबळजनक घटनेमुळे ग्वाल्हेर पोलीस अवाक झाले होते. पोलिसांनी या घटनेचा अपहरणाच्या दिशेने तपास करण्यास सुरुवात केली. दरम्यान, पोलीस तपासामध्ये याबाबतच्या घटनाक्रमाचा उलगडा केला. पोलीस तपासामध्ये १९ वर्षांची तरुणी तीन वर्षांपासून आरोपी रोहित कुशवाहा याच्या संपर्कात असल्याचे समोर आले. दोघांनी मिळून कुटुंबीयांना गुंगारा देण्यासाठी हा बनाव रचल्याचेही उघड झाले.
आखलेल्या योजनेनुसार आधी रोहित याने त्याच्या सहकाऱ्यासोबत मिळून या तरुणीचं चंद्रबदनी नाका पेट्रोलपंपाजवळून अपहरण केलं. खरंच अपहरण झालं, असं वाटावं म्हणून या तरुणीने मदतीसाठी आरडाओरडाही केला. त्यानंतर हे दोन्ही तरुण तिला दुचाकीवर बसवून घेऊन गेले.
ग्वाल्हेर पोलिसांना दिवसाढवळ्या एका तरुणीचं अपहरण झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर आयजी डी. श्रीनिवास वर्मा, एसपी राजेश सिंह चंदेल यांनी सूत्रं हलवण्यास सुरुवात केली. परिसरातील सीसीटीव्ही तपासले गेले. त्यात दुचाकीस्वार हे तरुणीला घेऊन ग्वाल्हेरच्या दिशेने गेल्याचे समोर आले.दोन्ही तरुणांनी वाटेत दुचाकी सोडून ते तरुणीला घेऊन बसने गुना येथे पोहोचल्याचे तपासात उघड झाले. त्यानंतर ते एका हॉलेटमध्ये जाऊन थांबले. तिथे या मुलीने त्या तरुणाची ओळख तिचा पती अशी करून दिली होती. दरम्यान, या ठिकाणी पोलिसांनी धडक देत या तरुणीला ताब्यात घेतले.