काही दिवसांपासून १० रुपयांत ४ समोसे विकणारा हातगाडीवाला चांगलाच प्रसिद्ध झाला होता. मात्र मध्य प्रदेशमधील महानगरपालिका प्रशासनाने शहरातील अतिक्रमणविरोधी कारवाई करताना ही हातगाडी जेसीबीखाली चिरडून टाकली आहे. पालिका प्रशासनाच्या या कारवाईला हातगाडी चालवणाऱ्या कुटुंबाने विरोध करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा या कुटुंबातील तीन सदस्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली. दरम्यान, या संपूर्ण कारवाईवर महानगरपालिकेचे अधिकारी मौन बाळगून आहेत.
दरम्यान, जबलपूर पोलीस ठाण्यासमोर एका कुटुंबातील अमन, अंकित आणि अभिराज साहू हे तीन भाऊ हातगाडीवरून समोसे विकायचे. ते दहा रुपयांना चार समोसे देत असल्याने त्याची चर्चाही खूप होत होती. दरम्यान, महानगरपालिकेचा ताफा कारवाई करण्यासाठी पोलीस ठाण्यासमोर हजर झाला. तेव्हा हे तिघेही भाऊ समोस्यांची गाडी घेऊन एका गल्लीमध्ये घुसले.
मात्र महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनमी कॉलनीमधून ही हातगाडी बाहेर खेचून आणली. तसेच ती जेसीबीखाली चिरडून नष्ट केली. यावेळी स्थानिकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र महानगरपालिकेचे कर्मचारी आणि पोलिसांसमोर कुणाचंच काही चाललं नाही.
दरम्यान, आता या कारवाईबाबत महापौर जगत बहादूर सिंह अन्नू यांनी सांगितलं की, महानगरपालिकेकडून अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू आहे. जर मनपा प्रशासनाच्या पथकाने एखादी हातगाडी विनाकारण तोडली असेल. तर ते चुकीचे आहे. आम्ही याबाबत पालिका अधिकाऱ्यांकडून माहिती घेत आहोत. तसेच पीडितांसोबतही याबाबत चर्चा केली जाणार आहे. दरम्यान महापौरांनी पीडितांना मदत देणार असल्याचेही सांगितले.
तर सोशल मीडियावरून या कारवाईवर खूप टीका होत आहे. तसेच काही जणांनी या कारवाईचा उल्लेख पालिका प्रशासनाची गुंडगिरी असा केला आहे. तर महानगरपालिकेला अतिक्रमण हटवायचं होतं. तर त्यांना ही हातगाडी जप्त करता आली असती किंवा अन्य ठिकाणी नेण्यास सांगता आलं असतं. मात्र अशा प्रकारे भररत्यात हातगाडा तोडणं हा कुठला न्याय आहे, अशी टीकाही एकाने केली आहे.