पाळण्यात झोपली होती चिमुकली, तेवढ्यात विषारी फुत्कार सोडत आला काळा नाग, त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 04:39 PM2023-08-07T16:39:30+5:302023-08-07T16:45:26+5:30
Madhya Pradesh: घरात पाळण्यामध्ये एक चिमुकली झोपली होती. तेवढ्यात घरामधील जिन्यावरून फुत्कारण्याचा आवाज येऊ लागला. जेव्हा त्या मुलीच्या आईने इकडे तिकडे नजर फिरवली तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानंतर...
घरात पाळण्यामध्ये एक चिमुकली झोपली होती. तेवढ्यात घरामधील जिन्यावरून फुत्कारण्याचा आवाज येऊ लागला. जेव्हा त्या मुलीच्या आईने इकडे तिकडे नजर फिरवली तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिची मुलगी ज्या पाळण्यात झोपली होती. त्याच्याजवळ पायऱ्यांवर कोब्रा जातीचा एक ४ फूट लांब साप वेटोळे घालून बसला होता. तसेच महिलेला पाहताच तो चवताळला.
या महिलेने प्रसंगावधान राखत चिमुकल्या मुलीला पाळण्यातून घेत ती ओरडत घराबाहेर पडली. घरातील इतर लोकही भीतीने घराबाहेर पडले. घरातील इतर काही सदस्यांनी हिंमत दाखवून गोण्या आणि विटा हटवल्या. मात्र तो साप तिथून हटत नव्हता. तसेच त्याचा रागही शांत होत नव्हता. सर्व प्रयत्नांनंतरही घरातील लोकांना सापाला हुसकावून लावण्यात यश आलं नाही. त्यानंतर त्यांनी त्याला पकडण्यासाठी सर्पमित्राला बोलावले. मात्र या सापाला पकडण्याचा प्रयत्न केला असता तो जोराजोरात फुत्कारू लागला.
अखेरीस सर्पमित्र अकीलबाबा यांनी त्याला १० मिनिटांत नियंत्रणात आणून पकडले. तसेच त्याला बाहेर घेऊन आले. त्यानंतर सापाला पाहण्यासाठी लोकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. अखेरीस या सापाला पिशवीत बंद करण्याल आलं. तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या कुटुंबीयांसह सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.
सर्पमित्र अकील बाबा यांनी सांगितलं की, पावसाळ्याच्या ऋतूमध्ये सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या बातम्या वारंवार येत असतात. जर कुठल्या व्यक्तीला सर्पदंश झाल्यास त्याने तंत्र-मंत्राच्या भानगडीत न पडता बुंदेलखंड मेडिकल कॉलेज किंवा सागर जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल व्हावं. तिथे सर्पदंशावरील लसी उपलब्ध असल्याने उपचार झाल्याने लोकांचे प्राण वाचू शकतात. तसेच पावसाळ्यामुळे बिळांमध्ये पाणी भरल्याने विषारी प्राणी सुक्या जागेच्या शोधात येत आहेत.