आपल्या रोजच्या आहारातील कुठल्या अन्नपदार्थात जर सर्वाधिक भेसळ कुठल्या पदार्थात होत असेल तर ती दुधामध्ये. ती भेसळ कशाप्रकारे होते आपल्या घरी आलेलं दूध शुद्ध आहे की भेसळयुक्त हे कळणं फार कठीण असतं. अशाच दुधात नदीचं पाणी मिसळून भेसळ करणाऱ्या एका दुधवाल्याचा फोटो मध्य प्रदेशमधील जिल्हाधिकारी संजय कुमार यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून व्हायरल केला आहे. या फोटोंमध्ये दूधवाला नदीतील पाणी दुधाच्या टाकीमध्ये ओतताना दिसत आहेत. संजय कुमार यांनी हे फोटो स्वत:च्या मोबाईल फोनच्या कॅमेऱ्यामध्ये क्लिक करून व्हायरल केले आहेत.
ही घटना श्योपूर शहराजवळ असलेल्या ढेंगदा बस्तीजवळ असलेल्या मोरडोंगरी नदीकिनारी मंगळवारी सकाळी घडली. येथे वनांचल येथून शहराकडे निघालेला एक दूधवाला दुचाकीवर दुधाचे कॅन बांधून नदीकिनारी पोहोचला. त्यानंतर त्याने कॅनमध्ये पाणी भरून ते दूध असलेल्या कॅनमध्ये ओतले. याचवेळी तिथून मॉर्निंग वॉकला जात असलेले जिल्हाधिकारी संजय कुमार यांनी त्याचे फोटो काढले.
त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या दूधवाल्याला अडवले आणि दुधात भेसळ न करण्याबाबत सक्त ताकीद दिली. जिल्हाधिकाऱ्यांच्या या कृतीमुळे इतर भेसळ करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. तर त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
याबाबत जिल्हाधिकारी संजय कुमार यांनी अधिक माहिती देताना सांगितलं की, आज सकाळी जेव्हा मी मॉर्निंग वॉकला निघालो होतो तेव्हा ढेंगदा नदीच्या किनाऱ्यावर एक दुधवाला दुधाच्या कॅनमध्ये पाणी मिसळत असल्याचे दिसले. जेव्हा त्याच्याजवळ जाऊन विचारणा केली तेव्हा त्याने दुधात पाणी मिसळत असल्याचे मान्य केले. बहुतांश दुधवाले असंच करतात, अस त्याने सांगितलं. त्यानंतर त्याला ताकीद देऊन सोडून दिलं. असं करणं हा सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी केलेला खेळ आहे. आम्ही तो थांबवण्यासाठी काम करू, तसेच जे ऐकणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.