देशातील ५ राज्यात नुकतेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळालं. ५ पैकी तीन राज्यात भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. मात्र, या तिन्ही राज्यात भाजपाने मुख्यमंत्रीपदी नव्या चेहऱ्यांना संधी देत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. विशेषत: मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना खुर्चीवरुन पायउतार व्हावं लागलं. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी मोहन यादव यांना संधी मिळाली. शिवराज सिंह म्हणजेच मध्य प्रदेशमधील मामांना हटवण्यात आल्यामुळे अनेकांना दु:ख झालं. आता, शिवराजसिंह चौहान यांच्याही मनातील खदखद बाहेर पडली आहे.
मुख्यमंत्रीपद गमावल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना शिवराजसिंह चौहान यांनी, मी भाजपाचा कार्यकर्ता आहे, पक्ष जो आदेश देईल तो मला मान्य आहे. मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नव्हतो, असेच त्यांनी म्हटलं होतं. मात्र, आज एका कार्यक्रमात बोलताना त्यांच्या मनातील खंत ओठावर आल्याचं दिसून आलं.
आपलं होम ग्राऊंड असलेल्या बुधनी येथील एका सभेत शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्रीपदी संधी न मिळाल्याबद्दल मनातील भावना व्यक्त केल्या. काहीतरी मोठा उद्देश असेल, अनेकदा राज्याभिषेक होता होता, वनवासही भोगावा लागतो, असे म्हणत शिवराजसिंह यांनी मनातील खंत बोलून दाखवली. माझं जीवन बहिणी-बेटी आणि जनता जनार्दनासाठी आहे. या भूमीवर मी तुमचं दु:ख दूर करायला आलो आहे. तुमच्या डोळ्यात अश्रू ठेवणार नाही, दिवस-रात्र काम करेल. आता, तुमच्यासाठी माझा पत्ता आहे, मामाचं घर.. बी८, ७४ बंगला... असे शिवराज सिंह यांनी म्हटले.