भोपाळ - सध्याच्या धकाधकीच्या जीवनात माणसाचं सरासरी आयुष्यमान कमी झालंय. त्यामुळे, ८० वर्षे जगलं तरी भरपूर झालं असे शब्द साहजिकच आपल्या कानावर पडतात. तर, गावात किंवा परिसरात एखाद्या व्यक्तीने वयाची शंभरी गाठल्यानंतर त्या क्षणाचे सेलिब्रेशन आणि चर्चाही होते. कारण, १०० वर्षे जगले म्हणजे नशिबवान आहात, असे उद्गागारही निघतात. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही १०० वर्षे जगणाऱ्यांबद्दल कौतुकाचे शब्द काढले आहेत. महाराज सिंह दांगी हे पुण्यात्मा होते, त्यांनी १०३ वर्षे आयुष्य जगले, ते दवतुल्य झाले होते, असेही त्यांनी म्हटले.
विदिशा येथे समाजसेवक तोरणसिंह दांगी यांचे वडिल महाराज सिंह दांगी यांच्या शोकसभेसाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान उपस्थित होते. त्यांनी महाराजांना श्रद्दांजली अर्पण केली. यावेळी, विदिशातील मान्यवर आणि महाराज दांगी यांचे कुटुंबीय, नातेवाईक उपस्थित होते.
भारतीय परंपरा आणि सनातन परिवार सांगतो की, मानवी शरीर नश्वर आहे. पण, आत्मा अजर-अमर आहे. आत्म्याला शस्त्राने कापले जाऊ शकत नाही, आगीत जाळून टाकले जाऊ शकत नाही. पाण्यात बुडवले जात नाहीत आणि हवेत कोरडंही केलं जाऊ शकत नाही. आत्मा हा सनातन, चिरंतन असून सच्चिदानंद यांचं स्वरुप आहे, असे मुख्यमंत्री चौहान यांनी म्हटले. महाराज दांगी यांचे मला सदैव आशीर्वाद मिळाले, गावचे सरपंच म्हणून त्यांनी केलेलं कार्य अतुलनीय आहे. गावच्या विकासासाठी त्यांनी स्वत:ची जमीनही देऊ केली. त्यांच्या चरणी मी प्रणाम करतो, असे चौहान यांनी म्हटले. तसेच, महाराज हे देवतुल्य व्यक्तीमत्त्व असल्याचंही त्यांनी सांगितलं.