मी मुलगा, माझं कोण ऐकणार...! गर्लफ्रेंडवर 'नाना' आरोप; आईला साद घालत मृत्यूला मिठी मारली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 08:00 PM2024-09-04T20:00:02+5:302024-09-04T20:00:27+5:30
अंगावर काटा आणणारी घटना; प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल
प्रेमात कोण कोणत्या थराला जाईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. प्रेम प्रकरणांमुळे अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. अशीच एक धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील इंदूर येथे घडली. येथील युवकाने प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलले. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सुसाईड नोट लिहून विविध बाबींवर प्रकाश टाकला. प्रेयसीचा भाऊ आपल्याला त्रास देत असल्याचा आरोप त्याने सुसाईड नोटमधून केला आहे.
मी कृतिकाला फोन केला होता कारण तिने माझे खोटे नाव का घेतले हे मला तिच्याकडून ऐकायचे होते. कृतिका मला जीवे मारण्याच्या धमक्या देत असे हे माझ्या घरच्यांना माहीत नव्हते. म्हणूनच मला सर्वांना सांगावे लागले की माझे आणि कृतिकाचे प्रेमसंबंध आहेत. पण, आई, तू काही काळजी करू नकोस. माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. मी माझ्या मोबाईलमध्ये व्हिडीओ बनवला आहे. कृतिकाने मला फोन केला तेव्हा मी रेकॉर्डिंग विकीच्या फोनवर पाठवले आहे. आता मी जात आहे आई, तुम्ही चांगले राहा आणि वडिलांना धीर दे. माझ्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा व्हायला हवी, असे संबंधित युवकाने सुसाईड नोटमध्ये लिहिले.
मृत रितीकचे गंभीर आरोप
याशिवाय, माझी गाडी ब्रिजखाली उभी आहे. माझे नाव रितीक आहे. माझ्या मृत्यूला कृतिका राठोड, तिचा भाऊ शुभम राठोड आणि निखिल राठोड जबाबदार आहेत. कृतिका आणि माझे वर्षभरापासून अफेअर होते. ही बाब तिच्या घरच्यांना समजली, त्यानंतर कृतिकाला घरातून पळून जाऊन माझ्याशी लग्न करायचे होते, मात्र तिने सोबत कोणतेही कागदपत्रे आणली नाहीत. त्यामुळे आमचे कोर्टातही लग्न होऊ शकत नव्हते. मी कृतिकासोबत काहीच वाईट केले नाही. कृतिकाला खाण्यापिण्यापासून ते कॉलेजला सोडण्यापर्यंत मी तिची काळजी घ्यायचो. मी कृतिकाला तिला लागणाऱ्या सर्व वस्तू आणून दिल्या, पण ती मला ब्लॅकमेल करू लागली. आपल्या बहिणीला बदनामीपासून वाचवण्यासाठी कृतिकाचा भाऊ शुभम हा १५ ते २० गुंडांसह आला आणि त्याने जबरदस्तीने माझा मोबाईल हिसकावून घेतला. मोबाईलमधील सर्व पुरावे त्यांनी मिटवून टाकले. माझ्या म्हणण्यावर पुराव्यांशिवाय कोणीही विश्वास ठेवणार नाही, कारण आम्ही मुले आहोत. आमचे कुणी ऐकणार नाही, मुलगी खोटे बोलली तरी सगळे मान्य करतील. म्हणूनच मी जीवन संपवत आहे, असेही मृत युवकाने सुसाईड नोटमध्ये नमूद केले.
तसेच माझे कुटुंबीय निर्दोष आहेत. त्यांना सुरक्षा द्या, कारण कृतिकाचा भाऊ रोज रात्री १० वाजता येतो, त्यानंतर तो माझ्या कुटुंबाला घाबरवतो. त्याला समजत नाही की त्याच्याच बहिणीने असे का केले? मी पोलिसांना हात जोडून विनंती करतो की, कृतिका आणि तिच्या सर्व भावांवर कडक कारवाई करावी, जेणेकरून मला न्याय मिळेल. पोलिसांना माझी विनंती आहे की, कृतिका राठोडला शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून माझ्यासारखे कृत्य कोणीही करता कामा नये. धन्यवाद, मी तुझ्यावर प्रेम करतो... मिस यू कृतिका, असेही रितीकने सुसाईड नोटच्या माध्यमातून नमूद केले.