मध्य प्रदेशातीलबागेश्वर धामचे मठाधिपती बागेश्वर धाम हे त्यांच्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. सामान्यांपासून सेलिब्रेटीपर्यंत त्यांची पोहोच असल्याचे दिसते. भारतीय क्रिकेट संघातील काही खेळाडू देखील धीरेंद्र शास्त्रींच्या दर्शनासाठी बागेश्वर धामला जात असतात. धीरेंद्र शास्त्रींची दिवसेंदिवस क्रेझ वाढतच चालली असून, आता त्यांचा एक भक्त तीस हजारांचं कर्ज काढून बागेश्वर धामला पोहचला.
धीरेंद्र शास्त्री यांना मोबाईलच्या माध्यमातून ऐकणाऱ्या त्यांच्या एका भक्तानं ३० हजार रूपयाचं कर्ज काढून बागेश्वर धाम गाठलं. मुंबईतील या व्यक्तीची सर्वत्र चर्चा रंगली आहे. धीरेंद्र शास्त्रींचा हा अनोखा भक्त पंखा रिपेअरिंग करून आपला उदरनिर्वाह करतो. बागेश्वर धामला जाण्यासाठी पैशांचं नियोजन न झाल्यानं कर्ज काढल्याचं तो सांगतो.
'बागेश्वर धाम सरकार' या अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये तो भक्त म्हणतो की, माझं घर होत नाही म्हणून मी इथे आलो आहे. शास्त्रींचे ऑनलाइन व्हिडीओ पाहून खूप प्रभावित झालो, त्यांच्या कथा ऐकायला चांगल्या वाटतात. भाड्याचं दुकान बंद करून फक्त त्यांची झलक पाहण्यासाठी आलो आहे. तसेच कर्ज का काढले असे विचारले असता त्याने म्हटले, "प्रवासासाठी पैसे नसल्यामुळे ३० हजार रूपयाचं कर्ज काढावं लागलं."
कुलदीप यादवची बागेश्वर धामला भेट आशिया चषकात चमकदार कामगिरी करणारा भारतीय फिरकीपटू कुलदीप यादवने देखील बागेश्वर धामला भेट दिली. आशिया चषकाच्या स्पर्धेला सुरूवात होण्याआधी देखील कुलदीप यादवने बागेश्वर धामला भेट दिली होती. खरं तर जुलैमध्ये देखील कुलदीप आशीर्वाद घेण्यासाठी बागेश्वर धामला पोहोचला होता. "चायनामॅन म्हणून ओळखला जाणारा जगप्रसिद्ध भारतीय फिरकीपटू आणि सरकारचे आवडते शिष्य कुलदीप यादव याने सरकारला भेट देण्यासाठी बागेश्वर धाम गाठले. आशिया चषकात मालिकावीराचा किताब पटकावल्यानंतर सरकारचे आशीर्वाद घेण्यासाठी त्याने हजेरी लावली. आगामी विश्वचषकात चांगली कामगिरी करावी यासाठी त्याने आशीर्वाद घेतले", अशा आशयाचे कॅप्शन असलेली पोस्ट 'बागेश्वर धाम सरकार' या अकाउंटवरून करण्यात आली आहे.