मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरु झाली आहे. गेल्या १७ वर्षांपासून मुख्यमंत्री पदावर राहिलेल्या शिवराजसिंह चौहान यांना गेल्या निवडणुकीत सत्तेतून पायउतार व्हावे लागले होते. परंतू, काँग्रेसचे ज्योतिरादित्य शिंदे भाजपात आल्याने शिवराज पुन्हा मुख्यमंत्री झाले होते. तेव्हापासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आज उरकण्यात आला आहे.
शिवराज सिंह चौहान यांच्या कॅबिनेटचा आज विस्तार झाला. यामध्ये गौरीशंकर बिसेन, राजेंद्र शुक्ल आणि राहुल सिंह लोधी यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. लोधी याना राज्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली, तर इतर दोघांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ देण्यात आली.
भाजपने विंध्य, महाकोशल आणि बुदेलखंड भागातून प्रत्येकी एक मंत्री करून जातीय आणि भौगोलिक समीकरण जुळविण्याचा प्रयत्न केला आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी तीन मंत्र्यांना शपथ देणे शिवराज सरकारसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
शिवराज यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या आता ३४ झाली आहे. तर एक मंत्रिपद रिकामे आहे. आजच चौथ्या मंत्र्यालाही शपथ दिली जाणार होती. यासाठी भाजपा आदिवासी किंवा अनुसूचित जातीच्या आमदाराची निवड करणार होती. परंतू, नावावर सहमती बनली नाही. शपथविधी कार्यक्रम पुढे ढकलल्यामुळे केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी अखेरच्या क्षणी भोपाळ एक्सप्रेसने ग्वाल्हेरला जाण्याचा कार्यक्रम पुढे ढकलला होता.