Madhya Pradesh Ujjain Mahakal temple Fire : मध्य प्रदेशातील उज्जैन येथील प्रसिद्ध महाकाल मंदिरात सोमवारी होळीच्या वेळी आयोजित भस्म आरतीदरम्यान अचानक आग लागली. या घटनेत १३ भाविक जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे. सर्व जखमींना किरकोळ दुखापत झाली असल्याने, जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उज्जैनचे जिल्हा दंडाधिकारी नीरज कुमार सिंह यांनी सांगितले की, गर्भगृहात भस्म आरती दरम्यान आग लागली. सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत.
आग कशी लागली?
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जगप्रसिद्ध ज्योतिर्लिंग श्री महाकालेश्वराच्या गर्भगृहात सोमवारी सकाळी भस्म आरती सुरू असताना आग लागली. यात पुजाऱ्यासह १३ जण भाजले. आरतीवेळी गुलाल उधळल्याने आग भडकली. त्यावेळी मंदिरात हजारो भाविक उपस्थित होते. सर्वजण महाकाल सोबत होळी साजरी करत होते. आरती करत असलेल्या पुजारी संजीव यांच्यावर कोणीतरी गुलाल फेकला असे जखमी सेवकाने सांगितले. गुलाल दिव्यावर पडला आणि गुलालात रसायन असल्याने आग लागली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
पुजाऱ्यांसह १३ जण जखमी
गर्भगृहाच्या चांदीच्या भिंतींना रंग आणि गुलालापासून वाचवण्यासाठी तेथे फ्लेक्स लावण्यात आले होते. त्यामुळे आगीचा अधिकच भडका उडाला आणि आग पसरली. काही लोकांनी अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत गर्भगृहात आरती करत असलेले पुजारी संजीव, विकास, मनोज, सेवाधारी आनंद कमल जोशी यांच्यासह १३ जण भाजले होते.
प्रकरणाची समितीकडून चौकशी केली जाणार
उज्जैनचे जिल्हाधिकारी नीरज सिंह यांनी सांगितले की, सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोणीही गंभीर नाही. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. समितीकडून याची चौकशी केली जाईल.