सागर : मध्य प्रदेशातील नौरादेही अभयारण्याला संरक्षित व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा दिला आहे. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने मंजुरी दिल्यानंतर तीन महिन्यांनी शुक्रवारी याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली. या अभयारण्याचे नाव बदलून वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प असे ठेवले आहे.
राज्यातील हा सातवा व्याघ्र प्रकल्प असेल. यात सागर, दमोह, नरसिंहपूर या जिल्ह्यांमधील १,४१,४०० हेक्टर इतक्या वनजमिनीचा समावेश आहे. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण आणि भारतीय वन्यजीव संस्था यांनी केलेल्या अभ्यासात चित्त्यांच्या संरक्षणासाठी हे क्षेत्र उपुक्त असल्याचे आढळून आले होते. संरक्षित प्रकल्पांची मंजुरी मिळाल्याने चित्त्यांना इथे हलविण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
अभयारण्यात १२ वाघ १९७५ मध्ये नौरादेही अभयारण्याची स्थापना करण्यात आली होती. हे १२०० चौरस किलोमीटर क्षेत्रावर विस्तारलेले आहे. या परिसरात मुख्यत्वे वाघ आणि चित्ते मोठ्या प्रमाणात आढळत असत. परंतु, पुरेसे संरक्षण नसल्याने कालांतराने येथील वाघ लुप्त झाले होते. वाघांची संख्या वाढवी या हेतूने २०१८ मध्ये इथे वाघ आणि वाघिणीच्या जोडीला सोडण्यात आले होते. सध्या या अभयारण्यात १२ वाघ आहेत.