ट्रेनमधून प्रवास करत असलेल्या कुलगुरूंना हृदयविकाराच तीव्र झटका आल्यानंतर त्यांचे प्राण वाचवण्याच्या प्रयत्नात विद्यार्थ्यांवर दरोड्याचा गुन्हा दाखल झाल्याची विचित्र घटना समोर आली आहे. पीके विद्यापीठाचे कुलगुरू ट्रेनमधून प्रवास करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. तेव्हा त्यांच्यासोबत असलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचे प्राण वाचवण्यासाठी स्टेशनबाहेर असलेली एक गाडी जबरदस्तीने ताब्यात घेत त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र तरीही कुलगुरूंचे प्राण वाचू शकले नाही. विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना रुग्णालयात नेण्यासाठी जी गाडी ताब्यात घेतली होती ती एका न्यायाधीशांची होती. जबरदस्तीने गाडी ताब्यात घेतल्याने या प्रकरणी विद्यार्थ्यांवर दरोड्याचा दुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल करण्यात आलेले विद्यार्थी हे अभाविपचे कार्यकर्ते असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अभाविपच्या कार्यकर्त्यांनी या कारवाईनंतर पोलीस ठाण्यामध्ये आंदोलन केले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री दिल्लीतून ग्वाल्हेरकडे येत असलेल्या दक्षिण एक्स्प्रेसमधून शिवपुरी येथील पीके विद्यापीठाचे उपकुलगुरू रणजीत सिंह यादव त्यांच्या काही विद्यार्थ्यांसह प्रवास करत होते. जेव्हा ही ट्रेन आग्रा येथे पोहोचली तेव्हा त्यांची प्रकृती बिघडू लागली. मुरैनाला येईपर्यंत त्यांची तब्येत आणखीच गंभीर झाली. हे पाहून विद्यार्थी काळजीत पडले. त्यांनी रेल्वेच्या हेल्पलाइनवर मदत मागितली.
ग्वाल्हेर स्टेशन आले तेव्हा कुलगुरूंची गंभीर प्रकृती पाहून विद्यार्थी ट्रेनमधून उतरून प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या बाजूला आले. मात्र तिथे त्यांना कुलगुरूंना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी कुठलीही मदत मिळाली नाही. त्यानंतर या विद्यार्थ्यांनी प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या बाहेर कार घेऊन उभ्या असलेल्या न्यायमूर्ती संजीव एस. कालगांवकर यांच्या ड्रायव्हरकडे वेदनेने विव्हळत असलेल्या कुलगुरूंना रुग्णालयात घेऊन जाण्याची विनंती केली. मात्र या ड्रायव्हरने नकार दिला. त्यानंतर संतापलेल्या विद्यार्थ्यांनी त्याच्याकडून चावी खेचली आणि कार ताब्यात घेत कुलगुरूंना रुग्णालयात नेले.
मात्र रुग्णालयात पोहोचेपर्यंत बराच उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर कुलगुरू व्ही. सी. यादव यांना मृत घोषित केले. तर दुसरीकडे न्यायमूर्तींची गाडी जबरदस्तीने पळवण्यात आल्याची खबर पोलिसांपर्यंत पोहोचली. त्यांनी शहरात नाकाबंदी केली. मात्र ही कार जयारोग्य रुग्णालयाजवळ सापडली. त्यानंतर जीआरपीचे पोलीस अधिकारी राकेश सेंगर यांच्या तक्रारीवरून विद्यार्थ्यांविरोधात पोलीस ठाण्यात दरोड्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.
दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना रुग्णालयात नेले ते अभाविपचे कार्यकर्ते असल्याची माहिती समोर आली. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचे कळताच अभाविपच्या कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात गोळा झाले होते.