गेल्या काही काळापासून महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसह देशभरात लव्ह जिहादचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. दर काही दिवसांनी कुठून ना कुठून यावर बातम्या येत असतात. भाजपाची याविरोधातील भूमिका ही कठोर राहिलेली आहे. असे असताना भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी मध्य प्रदेशमध्ये लव्ह जिहादवर प्रतिक्रिया दिली आहे.
जबलपुरमध्ये जेव्हा पक्षाच्या एका कार्यक्रमामध्ये पंकजा यांना लव्ह जिहादवरून प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी लव्ह जिहाद हे केंद्र सरकारच्या अजेंड्यामध्ये नसल्याचे स्पष्ट केले. तसेच प्रेम हे प्रेम असते, त्यात कोणतीही भिंत असता कामा नये, असे त्या म्हणाल्या.
माझ्या मते प्रेम हे प्रेम असते. प्रेमात कोणताही भिंत पाहिली जात नाही. प्रेम कोणत्याही बंधनांना मानत नाही. जर दोन व्यक्ती प्रेमामुळे सोबत राहत असतील तर त्याचा पूर्णपणे आदर करायला हवा. परंतू, जर एखाद्या महिलेला आंतरजातीय विवाहात अडकविले जात असेल, फसविले जात असेल तर या मुद्द्याला वेगळ्या पद्धतीने पहायला हवे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
धर्मांतराच्या कटाच्या नावाखाली काही मंडळी आंतरधर्मीय विवाहाला विरोध करत आहेत, यावर पत्रकारांनी पंकजा यांना प्रश्न विचारला होता. मध्य प्रदेशात या वर्षाच्या अखेरीस निवडणूक होणार आहे. यामध्ये आपला पक्ष पुन्हा सत्तेत येईल, असा दावा पंकजा यांनी केला. त्यांनी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या 'लाडली बहना योजने' अंतर्गत राज्यातील 1.25 कोटी महिलांना प्रत्येकी 1000 रुपये देण्याच्या पावलाचे कौतुक केले.