भोपाळ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक म्हणजे चित्ता प्रकल्प. या प्रकल्पाला एक वर्ष पूर्ण झाले असून, आता याच प्रकल्पाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात येणार आहे. दक्षिण आफ्रिकेतून मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये स्थलांतरित करण्यात आलेल्या काही चित्त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे अनेक आव्हाने समोर उभी राहिली आहेत. यातच दुसऱ्या टप्प्यासाठी सरकारकडून तयारीला सुरुवात करण्यात आली असून, दोन नवीन ठिकाणांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. त्यातच, आता आणखी एक गुडन्यूज आली आहे.
कुनो येथील नॅशनल पार्कमध्ये आशा या चित्ता मादीने तीन बछड्यांना जन्म दिला आहे. या चिमुकल्या बछड्यांचा व्हिडिओ समोर आला असून माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ट्विटरवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी १७ सप्टेंबर रोजी नामिबियातून आणलेल्या चित्त्यांना मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडून भारताच्या प्रोजेक्ट चित्ताचे उद्घाटन केले होते. या प्रोजेक्टचा पहिला वर्धापन दिन सप्टेंबर महिन्यात साजरा झाला. प्रोजेक्टच्या दुसऱ्या वर्षी चित्त्यांच्या प्रजननावर भर दिला जात आहे. त्यातील पहिली गुडन्यूज नववर्षाच्या दुसऱ्याचदिवशी आली. येथील आशा या चित्ता मादीने नॅशनल पार्कमध्ये तीन बछड्यांना जन्म दिला. त्यामुळे, पार्कमध्ये आनंदाचं वातावरण आहे. कारण, गेल्या काही महिन्यात येथील बहुतांश चित्त्यांचा मृत्यू झाल्यामुळे येथील वातावरण त्यांना पोषक ठरत नाही का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला होता. मात्र, आता गुडन्यूज मिळाल्याने दुसऱ्या वर्षातील चित्त्यांच्या प्रजनानावर भर देण्यात येत असल्याचे दिसून आले.
दरम्यान, हा प्रोजेक्ट देशातील चित्ता वाढीसाठी एक यशस्वी मानला जात आहे.