समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना योगी आदित्यानाथांनी केलेला आरोप झोंबला आहे. मध्य प्रदेशच्या पन्नामध्ये योगींनी प्रसारसभेच अखिलेश यादव यांना नळ चोर असे म्हटले होते. यावरून अखिलेश यांना प्रचारसभेवेळी एका पत्रकाराने प्रश्न विचारला असता त्याच्यावर अखिलेश भडकल्याचा प्रकार घडला आहे.
अखिलेश यादव पन्नामध्ये सपाचे उमेदवार महेंद्र यांच्यासाठी प्रचासभेला आले होते. तिथे पत्रकारांनी त्यांना काही प्रश्न विचारले. यामध्ये एका पत्रकाराने आदित्यनाथांचे नाव घेऊन टोंटी चोर (नळ चोर) यावर तुमचे काय म्हणणे आहे, असे विचारले होते. यावर अखिलेश यादवांनी या पत्रकाराला तू भाजपाचा एजंट असल्याचे म्हटले आहे. तसेच त्याला त्याचे नाव विचारत सोबतच्या नेत्यांना या पत्रकाराचा फोटो काढण्यास सांगितले.
जर तू भाजपाचा एजंट नसला असतास तर एवढा महागडा रे बॅनचा नकली गॉगल घातला नसतास, असे अखिलेश त्याला म्हणाले. या प्रकारचे लोक पत्रकारिता करणार का, अशा विकल्या गेलेल्या लोकांना बोलवत जाऊ नका, तू खरेच पत्रकार आहेस का असे म्हणत अखिलेश यांनी त्याला नाव विचारले. मुस्लिम असल्याचे पाहून त्यावरही अखिलेश यांनी मुस्लिमांची अशी भाषा असते का असा सवाल केला, तसेच मी जेव्हा मुख्यमंत्री निवास सोडला होता, तेव्हा भाजपाने तो धुतला होता, असे सांगितले.
अखिलेश यादवांची ही पहिलीच वेळ नाहीय. उत्तर प्रदेश विधानसभेच्या प्रचारसभेवेळी देखील त्यांनी पोलिसांना उद्देशून ए पोलीस, ए पोलीस, कशाला तमाशा करताय, तुमच्यापेक्षा कोणीही उद्धट असू शकत नाही, असे यादवांनी म्हटले होते. कालच्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी यावर प्रतिक्रिया देत आहेत.