Vidisha Lok Sabha Election Result 2024 : विदिशामध्ये शिवराज सिंह चौहान बनवणार रेकॉर्ड! ३ लाख मतांनी आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 01:01 PM2024-06-04T13:01:20+5:302024-06-04T13:03:32+5:30
Vidisha Lok Sabha Election Result 2024 : विदिशा लोकसभा मतदारसंघातून शिवराज सिंह चौहान हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
Vidisha Lok Sabha Election Result 2024 : भोपाळ : मध्य प्रदेशातील लोकसभेच्या २९ जागांसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. याठिकाणी अशा अनेक हॉट सीट आहेत, ज्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. यावेळी माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) सुद्धा लोकसभा निवडणूक लढवत आहेत. विदिशा लोकसभा मतदारसंघातून शिवराज सिंह चौहान हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
दरम्यान, शिवराज सिंह चौहान विदिशामधून मोठी आघाडी घेतली असून नवा रेकॉर्ड बनवण्याच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. शिवराज सिंह चौहान विदिशामधून ३ लाख मतांनी आघाडीवर आहेत. तर काँग्रेसचे भानु प्रताप शर्मा पिछाडीवर आहेत. शिवराज सिंह चौहान यांना आतापर्यंत ४३४२०८ मते मिळाली आहेत, तर काँग्रेसचे प्रतापभानू शर्मा यांना १०७२७३ मते मिळाली आहेत.
विदिशा या जागेवरून शिवराज सिंह चौहान हे पाच वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. ही जागा भाजपासाठी सर्वात सुरक्षित मानली जाते. विदिशाचे वैशिष्ट्य म्हणजे येथून भाजपाने ज्याला उमेदवारी दिली आहे, तो सहज विजयी होतो. विदिशा लोकसभा ही मध्य प्रदेशातील सर्वात प्रतिष्ठित जागा मानली जाते, कारण माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी या जागेवरून निवडणूक लढवली होती. देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या एकेकाळी येथून खासदार होत्या.
याचबरोबर, नोबेल शांतता पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी येथील असल्याने विदिशा देशातही प्रसिद्ध आहे. हे शहर बेटवा नदीच्या काठावर असून सुंदर घाटांसाठी प्रसिद्ध आहे. येथील उदयगिरी लेणीही जगप्रसिद्ध आहेत. तसेच, येथे स्थित सांची स्तूप देखील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. जगातील बौद्ध धर्मावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठीही हे श्रद्धेचे केंद्र आहे. विदिशा लोकसभा मतदारसंघांतर्गत ८ विधानसभा मतदारसंघ आहेत, ज्यात भोजपूर, सांची, सिलवानी, विदिशा, बासोदा, बुदनी, इछावर आणि खाटेगाव यांचा समावेश आहे.