मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत हिंसाचार, गोळीबार, बॉम्बफेक, भाजपा उमेदवारावर हत्येचा गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 08:47 PM2023-11-17T20:47:53+5:302023-11-17T20:48:30+5:30
Madhya Pradesh Assembly Election: मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आज ७० टक्क्यांहून अधिक मतदान झाले. मात्र यावेळी राज्यात मतदानावेळी हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या.
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आज ७० टक्क्यांहून अधिक मतदान झाले. मात्र यावेळी राज्यात मतदानावेळी हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या. छतरपूरमध्ये भाजपा उमेदवरा अरविंद पटेरिया यांच्यासह २० जणांविरोधात हत्येचा आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरविंद पटेरिया हे राजनगर मतदारसंघातील भाजपा उमेदवार आहेत. त्यांच्यावर काँग्रेस उमेदवार विक्रम सिंह नाती राजा यांच्या समर्थकाची गाडीखाली चिरडून हत्या केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
नाती राजा यांनी आरोप केला की, काल रात्री दोन्ही पक्षांमध्ये वाद झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्याच्या अंगावर गाडी घालून त्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर काँग्रेस आमदार विक्रम सिंह यांनी अरविंद पटौरिय यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तर जबलपूरमध्ये दोन राजकीय पक्षांच्या समर्थकांमध्ये दोन ठिकाणी हाणामारी झाली. जबलपूर पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपा आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यंमध्ये बॉम्बफेक आणि गोळीबार झाला. इथे काँग्रेस आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हवेग गोळीबार केला. तसेच बॉम्बफेकही करण्यात आली. यामध्ये पोलिसांसह भाजपा उमेदवार अंचल सोनकर यांचे सहकारी जखमी झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला.