‘कमल’ की कमलनाथ?; मध्य प्रदेशातील २३० जागांसाठी निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 10:31 AM2023-11-16T10:31:35+5:302023-11-16T10:31:49+5:30
मध्य प्रदेश विधानसभेच्या २३० जागांसाठी १७ नोव्हेंबर रोजी मतदान आहे.
- कमलेश वानखेडे
नागपूर : मध्य प्रदेश विधानसभेच्या २३० जागांसाठी १७ नोव्हेंबर रोजी मतदान आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी शक्ती पणाला लावली. बुधवारी सायंकाळी ५ वाजता प्रचारतोफा थंडावल्या. आता मतदारांना ‘कमल की कमलनाथ?’ यावर विचार करायला पुढील दोन दिवस मिळणार आहेत. यावेळी मध्य प्रदेशात भाजपचा पत्ता साफ होईल, असा काँग्रेसचा दावा आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गॅरंटीची जादू काम करेल, असा भाजपला विश्वास आहे. ३ डिसेंबर रोजी मतमोजणीनंतर चित्र स्पष्ट होईल.
प्रचारात भाजपने शक्ती पणाला लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह ३९ स्टार प्रचारक मैदानात उतरले. काँग्रेसकडून राहुल गांधी यांनी सभा व रोड शो करीत मोर्चा सांभाळला. माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह व सचिन पायलट यांनी सुमारे २०० हून अधिक सभा व रोड शो केले. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एकट्याने तब्बल १६० सभा व रोड शो तर कमलनाथ यांनी एकट्याने ११४ सभा व रोड शो केले.
‘त्या’ ३८ जागांवर भाजपचा फोकस
भाजपने विजयाचा मार्ग सुकर करण्यासाठी महाकौशल विभागातील ३८ जागांवर फोकस केला आहे. २०१८च्या निवडणुकीत काँग्रेसने येथील ३८ पैकी २४ जागा जिंकत ११४ पर्यंत मजल मारली होती. त्यामुळे भाजपने या विभागातील जबलपूर, छिंदवाडा, कटनी, सिवनी, नरसिंहपूर, मांडला, डिंडौरी व बालाघाट या आठ जिल्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. भाजपने या विभागात केंद्रीय मंत्री फग्गन सिंह कुलस्ते व प्रल्हाद पटेल यांना रिंगणात उतरवून सामना फिरवण्याचा प्लॅन आखला आहे.
महिला मतदार ठरणार निर्णायक
मध्य प्रदेशात यावेळी महिला मतदारांची संख्या वाढली आहे. ७ जिल्ह्यांमध्ये तर महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे. या निवडणुकीत सुरुवातीपासूनच महिला मतदार निर्णायक भूमिकेत आहेत. nमहिला मतदारांवर लक्ष केंद्रित करत घोषणा करण्यावर भर दिला. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ‘लाडली बहना’ योजना जाहीर करताच काँग्रेसनेही ‘नारी सम्मान योजने’ची घोषणा करीत महिलांना साद घातली. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री चौहान यांनी राज्यातील प्रत्येक महिलेला लखपती करू तसेच ‘लाडली बहना’ योजनेतून सुटलेल्या महिलांची नावे समाविष्ट करण्याची घोषणा केली.
योगी आदित्यनाथ, फडणवीस यांच्या प्रचारसभा
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ज्योतिरादित्य शिंदे, नरेंद्र सिंह तोमर, प्रल्हाद पटेल, फग्गनसिंह कुलस्ते, स्मृती इरानी, उत्तराखंडचे मंत्री सतपाल महाराज यांनी प्रचारसभा घेत मैदान गाजवले. काँग्रेसकडून स्टार प्रचारक महासचिव प्रियंका गांधी यांनी दतिया व चंडवाही येथे जाहीर सभा घेत भाजपला गेल्या १८ वर्षांतील कामांचा हिशेब मागितला. भाजपवर त्यांनी जोरदार टीका केली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही बैतूल, बैरसिया व भोपाळ येथे जाहीर सभा घेत मतदारांना साद घातली.