नवी दिल्ली : २०१८ च्या निवडणुकीत चांगल्या जागा मिळून दोन वर्षे सत्तेत राहिलेली काँग्रेस पुन्हा एकदा भाजपचा पराभव करण्याच्या दृष्टीने मैदानात आहे. २० वर्षे सत्तेत असलेल्या शिवराज सिंह चौहान यांनाही आपला दबदबा कायम राखायचा असून त्यासाठी त्यांनी अनेक सभा घेतल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक नेत्यांनी मध्य प्रदेशात प्रचारसभा घेतल्या आहेत.
काँगेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्ष राहुल गांधी, महासचिव प्रियांका गांधी, कमलनाथ, माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते प्रचारात उतरले होते. समाजवादी पार्टीनेही मध्य प्रदेशात जोर लावला आहे. अखिलेश यादव यांनी या राज्यात काही सभा घेत भाजपवर टीका केली. गेल्यावेळचे मतदान बघितले तर भाजप आणि काँग्रेस यांच्या मतांमध्ये केवळ ०.०१ टक्क्याचा फरक होता. हीच अटीतटीची लढाई यंदाही कायम राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. २,५३३ उमेदवार रिंगणात असून शुक्रवारच्या मतदानात त्यांचे भवितव्य निश्चित हाेईल.
लोकसभेची सेमीफायनल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा महत्त्वाचा टप्पा शुक्रवारी पार पडणार असून मध्य प्रदेशमध्ये २३० जागांसाठी तर छत्तीसगडच्या दुसऱ्या व अंतिम टप्प्याच्या ७० जागांसाठी मतदान होणार आहे. दोन्ही राज्यांत काँग्रेस विरुद्ध भाजप अशी तगडी लढत पाहायला मिळणार आहे.
निवडणुकीत काय गाजले?
भाजप नेत्यांनी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप करत जनतेचा पैसा उडवल्याची टीका केली. तसेच राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करून मतदारांच्या श्रद्धेला हात घालण्याचाही प्रयत्न केला. काँग्रेसने ओबीसी मुद्द्यावरून प्रचार करत राज्यातील ४८ टक्के समाजाला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला. तसेच जातीय जनगणनेवर भर दिला. तसेच प्रियांका गांधी यांनी राज्यातील बेरोजगारीवरून सत्ताधारी पक्षावर टीका केली. बसपने राज्यात १८३ जागांवर उमेदवार दिलेले आहेत. शिवाय बसपने गोंडवाना गणतंत्र पार्टीशी युती केली असून तिथे ४५ जागाही दिल्या आहेत. या युतीचा भाजप आणि काँग्रेसच्या जागांवर काय परिणाम होईल, बसप किती मते खाईल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
छत्तीसगड कोणाचे?
छत्तीसगडमध्ये येथे दुसऱ्या टप्प्यातील मतदान आहे ९० पैकी ७० जागांवर ९५८ उमेदवार रिगंणात आहेत. काँग्रेसच्या भुपेश बघेल सरकारची यंदा परीक्षा आहे. त्यांच्याविरोधात आरोपांची धार तीव्र करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगलाच हल्लाबोल केला आहे. बघेल यांच्यावर महादेव ॲप प्रकरणी मोठी टिकाही झाली. त्याचा किती परिणाम काँग्रेसच्या मतांवर होतो हे मतदारांच्या हाती आहे. काँग्रेसने हे राज्य टिकवण्यासाठी चांगलाच जोर लावला आहे. राहुल गांधी यांनी या राज्यात अनेक सभा घेतल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्याही येथे अनेक सभा झाल्या आहेत.
महिला मतदारांवर लक्ष
भाजपनेे विवाहित महिला मतदारांना वर्षाला १२ हजार रुपये मदत देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात दिले आहे. मुख्यमंत्री बघेल यांनीही काँग्रेस सरकार सत्तेत राहिल्यास महिलांना दरवर्षी १५ लाख रुपयांची आर्थिक मदत देणार असल्याचे जाहीर केले. महिलांची सर्वाधिक मते कोणाला मिळतात हे निकालात कळेल.