शेतीला पाणी अन् पिण्याच्या पाण्यासाठी घरोघरी नळ, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मिशन जलसिंचन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 12:18 PM2023-08-01T12:18:34+5:302023-08-01T12:24:48+5:30
शेतीसाठी पाणी आणि मिशन जलजीवन योजनेद्वारे घरोघरी जल पोहोचवण्याचं काम सरकारच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
भोपाळ - राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी आणि घरोघरी नळातून पिण्याचे पाणी देण्याची घोषणा केली. त्यासाठी, मध्य प्रदेश सरकारतर्फे कटनी क्षेत्रासाठी १०११ कोटी रुपयांची जलसिंचन योजना राबवण्यात येत असल्याचे सांगितले. कटनी जिल्ह्यातील विकासकामांच्या भूमीपूजन सोहळ्यात चौहान यांनी उपस्थितांना संबोधित करताना यापूर्वीच्या सरकारमधील आणि विद्यमान सरकारमधील फरक सांगितला. राज्यातील जलसिंचन क्षेत्रात मोठी वाढ होत असून सिंचन योजनांच्या माध्यमातून शेती पाण्याखाली आणली जात असल्याचे मुख्यमंत्री चौहान यांनी म्हटलं.
शेतीसाठी पाणी आणि मिशन जलजीवन योजनेद्वारे घरोघरी जल पोहोचवण्याचं काम सरकारच्या माध्यमातून करण्यात येत आहे. कटनी परीक्षेत्रासाठी १०११ कोटी रुपयांची जलसिंचन योजना मंजूर करण्यात आली असून ८० हजार एकर जमिन ओलिताखाली येणार आहे. तसेच, कटनी तालुक्यातील बहोरीबंद येथील ८६, रीठी येथील १७ आणि स्लीमनाबादच्या ४३ गावांना या पाण्याचा लाभ मिळणार आहे. तर, जलजीवन मिशनद्वारे कटनी जिल्ह्यातील रीठी जनपदच्या १०९ आणि कटनी जनपदच्या ५० गावांसह जिल्ह्याच्या पठारी प्रदेशातील १५९ गावांमध्ये आता नळाद्वारे सहजपणे पाणी पोहोचणार आहे.
कटनी जिल्ह्यातील बडगांव येथील जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री चौहान यांनी राज्यातील जलसिंचन व मिशन जलजीवन योजनांबाबत माहिती दिली. यावेळी, त्यांनी कटनी जिल्ह्यातील ३१३ कोटींच्या विकासकामांचे भूमीपूजन केले. राज्यातील विकासकामांची माहिती देताना महिला भगिंनीसाठी नुकतेच सुरु केलेल्या लाडली बहन योजनेचा उल्लेख करत राज्यात सरकार नसून कुटुंब आहे. एक कुटुंब म्हणून आपण राज्याचा कारभार चालवत आहोत. राज्यातील प्रत्येक व्यक्ती हा या कुटुंबाचा सदस्य आहे, असेही यावेळी चौहान यांनी म्हटले.