तुझी लायकी काय?, कलेक्टर संतापले; ट्रक ड्रायव्हरच्या उत्तराने सारेच अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 08:43 PM2024-01-02T20:43:19+5:302024-01-02T20:56:37+5:30
जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित ड्रायव्हर्संना सूचना केल्या असता, एका ड्रायव्हरने स्वत:ची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.
भोपाळ - केंद्र सरकारच्या 'हिट अँड रन' संदर्भातील नवीन कायद्याला विरोध करत ट्रकचालक रस्त्यावर उतरले आहेत. ट्रक आणि टँकर चालकांनी चक्का जाम आंदोलन सुरू केले असून मंगळवारपासून गाड्या एकाच जागेवर आहेत. त्यामुळे, सर्वच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. त्या अनुषंगाने मध्य प्रदेशच्या शाजापूर येथील जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीचं आयोजन केलं होतं. किशोर कन्याल यांनी ट्रक व टँकरचालकांसमवेत बैठक घेतली. या बैठकीत सर्वांनाच कायदा हातात न घेण्याचं सूचवलं. यावेळी, ड्रायव्हर आणि जिल्हाधिकारी यांच्यात शाब्दीत वाद झाला.
जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित ड्रायव्हर्संना सूचना केल्या असता, एका ड्रायव्हरने स्वत:ची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. तसेच, नीट समजावून सांगा, असेही तो म्हणाला. त्यावर, जिल्हाधिकारी महोदयांना राग अनावर झाला आणि त्यांनी ड्रायव्हरला सुनावले. यामध्ये चुकीचं काय आहे?, समजतो काय स्वत:ला, काय करणार तू, तुझी लायकी काय?, असे म्हणत जिल्हाधिकाऱ्यांनी ड्रायव्हरच्या आत्मसन्मानावरच हल्लाबोल केला. त्यावर, ड्रायव्हरने दिलेल्या उत्तराने कलेक्टर महोदयांची बोलतीच बंद झाली.
हीच तर आमची लढाई आहे की, आमची काहीच लायकी नाही. त्यावर, कलेक्टर म्हणाले लढाई अशी असू शकत नाही. कृपया तुम्ही कायदा हातात घेऊ नका, तुमच्या सर्व अडचणी ऐकण्यासाठीच तुम्हाला इथं बोलावलं आहे, असे जिल्हाधिकारी किशोर कन्याल यांनी म्हटलं.
दरम्यान, कलेक्टर महोदय रागावल्याने काही वेळेसाठी बैठक स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर, ड्रायव्हरने माफीही मागितली. तर, जिल्हा प्रशासनानेही आंदोलन शांतीपूर्ण पद्धतीने करा, कुठलाही हिंसाचार करू नका, असे आवाहन ड्रायव्हर्संना केले.
काय आहे प्रकरण
हिट अँड रन संदर्भात केंद्र सरकारने केलेल्या नवीन कायद्याला विरोध करत ट्रक ड्रायव्हर्सने चक्का जाम आंदोलन सुरू केले आहे. भारतीय न्याय संहितानुसार बेजाबादारपणे गाडी चालवून गंभीर दुर्घटनेला कारणीभूत असलेल्या आणि पोलीस प्रशासनातील कुठल्याही अधिकाऱ्याला न सांगता पळ काढणाऱ्या वाहनचालकांना १० वर्षांपर्यंतची शिक्षा किंवा ७ लाख रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. कायद्यातील शिक्षेची ही तरतूद मोठी असून त्यास ट्रकचालकांचा विरोध आहे. तसेच, जोपर्यंत हा कायदा वापस घेतला जात नाही, तोपर्यंत विरोध आंदोलन सुरूच राहिल, असे ट्रकचालकांचे म्हणणे आहे.