ज्योतिरादित्य शिंदे बिझी काय झाले, नरेंद्र सिंह तोमरांनी पद पटकावले, राजकारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 03:22 PM2023-07-15T15:22:03+5:302023-07-15T15:22:25+5:30
अमित शहा यांनी मंगळवारी भोपाळमध्ये पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली तेव्हाच निवडणुकीसाठी टीम तयार केली जाणार असल्याची चर्चा होती.
भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. याामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह दौरे करत आहेत. या दौऱ्यावेळी दोन महत्वाचे निर्णय घेण्य़ात आले आहेत. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव यांना राज्याचे प्रभारी बनवण्यात आले आहे, तर दुसऱ्या निर्णयात केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांची निवडणूक व्यवस्थापन समितीच्या निमंत्रकपदी नियुक्ती करण्याची घोषणा करण्यात आली. यामुळे ज्योतिरादित्य शिंदेंबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत.
अमित शहा यांनी मंगळवारी भोपाळमध्ये पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली तेव्हाच निवडणुकीसाठी टीम तयार केली जाणार असल्याची चर्चा होती. या बैठकीनंतर ज्योतिरादित्य शिंदे खूप व्यस्त दिसत होते. शिंदे यांनी राज्यपाल मंगूभाई पटेल यांची भेट घेतली होती. भेटीनंतर अमित शहा त्यांना सोबत घेऊन दिल्लीला गेले. दुसऱ्याच दिवशी शिंदे पुन्हा भोपाळला आले, यानंतर ते शिवपुरी लोकसभा मतदारसंघात व्यस्त राहिले. शिंदे राज्याच्या राजकारणात सक्रीय झाल्याने त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते अशी चर्चा होती. मात्र, तोमर यांच्याकडे निवडणुकीचा जबाबदारी देण्यात आली आहे.
तोमर यांची नियुक्ती ही शिंदेना धक्का मानली जात आहे. तोमर यांना शिंदेंचे प्रतिस्पर्धी मानले जाते. याचबरोबर तोमर हे शिंदेंच्याच ग्वाल्हेर-चंबळ भागातील आहेत. याच भागात भाजपाची परिस्थिती ठीक नसल्याचे सर्वच सर्वेक्षणांमध्ये समोर आले आहे. ऐन मोक्याच्या वेळी शिंदेंच्या विरोधात पक्षातील जुने नेते बंड पुकारतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हे झाले आहे. यामुळे शिंदेंच्या समर्थकांची तिकीटे कापली जाण्याची शक्यता आहे. यामुळे तोमर अशा पदावर बसल्याचा फटका शिंदेंना बसणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.