मध्य प्रदेशचा नवा 'बॉस' कोण? दिल्लीत बैठकांवर बैठका, इकडे ग्वाल्हेरमध्ये पोस्टर लागले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 06:05 PM2023-12-07T18:05:18+5:302023-12-07T18:05:35+5:30
विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गज विजयी झाले आहेत. नवे मुख्यमंत्री म्हणून अनेकांच्या नावाची चर्चा आहे.
मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोठे यश मिळाले आहे. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री पदावरून गटबाजी सुरु झालेली असताना इकडे मात्र सध्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आपण मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले आहे. तर मुख्यमंत्री पदावरून दिल्लीत चर्चांवर चर्चा सुरु झाल्या आहेत. अशातच मध्यप्रदेशचा नवा बॉस नरेंद्र सिंह तोमर असे बॅनर ज्योतिरादित्य शिंदेंच्या ग्वाल्हेरमध्ये लागू लागले आहेत.
यामुळे दोन प्रकारच्या चर्चांना उधाण आले आहे. एकतर तोमर हे शिंदेंचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. दुसरे म्हणजे तोमर हे केंद्रात मंत्री होते, त्यांना राज्यात मुख्यमंत्री करून भाजपा राज्यातील नेत्यांना काही संकेत देऊ पाहत असेल.
विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गज विजयी झाले आहेत. नवे मुख्यमंत्री म्हणून अनेकांच्या नावाची चर्चा आहे. शिवराज चौहान कितीही वेळा नाही म्हणाले तरी ते शर्यतीत आहेत. यानंतर तोमर, प्रल्हाद पटेल, भाजपाचे राष्ट्रीय महासचिव कैलास विजयवर्गीय यांचे नाव चर्चेत आहे. आता भाजपा या नेत्यांपैकी कोणाला निवडते की दुसऱ्याच कोणाला संधी देते हे समजणार आहे.
ग्वाल्हेरमध्ये मोठमोठे पोस्टर लागले आहेत. तोमर यांच्या फोटोसह मध्येच मोठा मध्यप्रदेशचा नकाशा आहे, त्यावर BOSS असे लिहिण्यात आले आहे. असे पोस्टर ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. यामुळे चर्चांना उधाण आले आहे. तसे तर हे पोस्टर उतावीळ कार्यकर्ते लावतात, परंतू वरिष्ठ नेत्यानेच त्यांना काही संकेत दिले असतील तर ते खरेही असू शकतात अशी चर्चा आहे.