अभिलाष खांडेकरभोपाळ : विधानसभा निवडणुकीत अलीकडच्या वर्षांत झालेल्या सर्वांत वाईट पराभवावर चर्चा करण्यासाठी पराभूत आणि निराश झालेल्या काँग्रेसची मंगळवारी येथे बैठक होत आहे. दरम्यान, काँग्रेसचे काही नेते कमलनाथ यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा मागू शकतात, असे समजते.
प्रदेश काँग्रेस कमिटीने जारी केलेल्या पत्रानुसार, पक्षाने तिकीट दिलेल्या सर्व २३० उमेदवारांना मंगळवारी बैठकीसाठी भोपाळला बोलावण्यात आले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ हे निवडणुकीत जिंकलेल्या आणि पराभूत झालेल्या उमेदवारांशी संवाद साधणार आहेत. मध्य प्रदेशात भगव्या लाटेत काँग्रेसला ६६ जागा जिंकण्यात यश आले आहे.
तीन वर्षांपूर्वीच्या कमलनाथ सरकारमधील जवळपास सर्वच मंत्री पी. सी. शर्मा, तरुण भानोत, कमलेश्वर पटेल, जितू पटवारी, सज्जन सिंह वर्मा, प्रियव्रत सिंह, हुकुम सिंह कराडा, डॉ. विजयलक्ष्मी साधो हे पराभूत झाले आहेत. कमलनाथ आणि दिग्विजय सिंह यांच्यात आपआपल्या समर्थकांना तिकीट मिळवून देण्यासाठीचा संघर्षही अनेक उमेदवारांच्या पराभवास कारणीभूत ठरल्याचे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले. काँग्रेसचे काही नेते कमलनाथ यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा मागू शकतात, असे समजते.
दरम्यान, कमलनाथ यांनी मंगळवारी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ चर्चा केली.