'चांगले लोकही आहेत, बजरंग दलावर बंदी घालणार ...'; दिग्विजय सिंह यांनी सांगितला काँग्रेसचा प्लान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 09:38 AM2023-08-17T09:38:19+5:302023-08-17T09:39:09+5:30
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या प्लानवर प्रतिक्रीया दिली.
'जर आमचा पक्ष सत्तेवर आल्यास बजरंग दलावर बंदी घालणार नाही. मात्र, गुंड आणि दंगलखोरांना सोडले जाणार नाही, असा इशारा मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह यांनी दिला. राज्याची राजधानी भोपाळ येथील प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यालयात बुधवारी पत्रकारांशी संवाद साधताना सिंह यांनी हा इशारा दिला.
खासदार दिग्विजय सिंह म्हणाले, "बजरंग दलात काही चांगले लोक असू शकतात म्हणून आम्ही बजरंग दलावर बंदी घालणार नाही." मात्र दंगल किंवा हिंसाचारात सहभागी असलेल्या कोणालाही आम्ही सोडणार नाही.
"लाल किल्लाही आज भयग्रस्त व अस्वस्थ असेल"; मोदींच्या भाषणावर शिवसेनेचा बाण
यावेळी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलताना सिंह म्हणाले की, मी हिंदू होतो, हिंदू आहे आणि हिंदूच राहणार. मी हिंदू धर्माचे पालन करतो आणि सनातन धर्माचा अनुयायी आहे. मी त्या सर्व भाजप नेत्यांपेक्षा चांगला हिंदू आहे. 'भारत देश हिंदू, मुस्लिम, शीख आणि ख्रिश्चन सर्वांचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी देशाचे विभाजन करणे थांबवावे. देशात शांतता प्रस्थापित करावी, शांततेनेच देशाची प्रगती होईल, असा टोलाही सिंह यांनी भाजपला लगावला.
"भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती माझ्या धाकट्या बहीण आहेत आणि भाजपने त्यांच्याशी काय केले हे आपण पाहू शकतो." भारती दारूबंदीच्या विरोधात कशा लढाई लढत होत्या, त्यांनी आवाज उठवला पण त्यात त्यांना यश मिळाले नाही. गेल्या २० वर्षात भाजपचे कुशासन आहे, सर्वत्र भ्रष्टाचार आहे. नोकरी, कंत्राटे आणि धार्मिक कार्यक्रमातही भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप सिंह यांनी केला.