नवी दिल्ली – मध्य प्रदेशच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. अशात सत्ताधारी भाजपा पक्षाकडून निवडणुकीच्या घोषणेआधीच उमेदवारांच्या ३ याद्या जाहीर झाल्यात. त्यात ८० जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यात अनेक नावे धक्कादायक आहेत. पक्षाने ३ केंद्रीय मंत्री, ४ खासदार आणि संघटनेच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे भाजपात नाराजी आणि बंडखोरीचे संकेत मिळत आहेत.
सतना जिल्ह्यातील ४ वेळा आमदार राहिलेले नारायण त्रिपाठी यांनाही पक्षाने उमेदवारी नाकारून नवीन चेहऱ्याला संधी दिली आहे. नाराज त्रिपाठी म्हणाले की, जर इतके वरिष्ठ खासदार, नेते आणि मंत्र्यांना भाजपा निवडणुकीत उभे करू शकते तर मुरली मनोहर जोशीजी, लालकृष्ण अडवाणी यांचा गुन्हा काय होता? ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आता खासदार, मंत्री विधानसभेची निवडणूक लढवणार मग आमदारांनी सरपंचाची निवडणूक लढवायची का? युवा राष्ट्रची संकल्पना असणाऱ्या भाजपाने ज्येष्ठ नेत्यांना विधानसभेचे तिकीट दिले आहे. त्रिपाठी यांनी मैहर जागेवरून आतापर्यंत ४ वेगवेगळ्या पक्षाकडून निवडणूक लढवली आणि जिंकलीही.
'तिकीट कापल्यानं आमदार संतापले!
भाजपाने आणखी एक आमदार केदारनाथ शुक्ला यांचेही तिकीट कापले. शुक्ला हे चार वेळा आमदार राहिलेत. ते सिधी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. केदारनाथ शुक्ला यांच्या जागी पक्षाने खासदार रीती पाठक यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. सीधी येथील लघवी प्रकरणाच्या घटनेनंतर भाजपाचे नेतृत्व शुक्ला यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जाते. या घटनेतील आरोपीचे नाव शुक्ला यांच्या जवळचे असल्याचे समोर आले होते.
भाजपाने कैलाश विजयवर्गीय यांना इंदूर-१ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. विजयवर्गीय यांना तिकीट दिल्याबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय. मंगळवारी विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते म्हणाले, तुम्हा सर्वांना कैलाश विजयवर्गीय बनून काम करावे लागेल. येथे विक्रमी विजय मिळावा हीच माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे. मला लढण्याची एक टक्काही इच्छा नव्हती. लढण्याची एक मानसिकता असते आता मोठे नेते झालोय. हातपाय जोडायला कुठे जमणार? मला जाऊन भाषण करावे लागेल. मग निघावे लागेल. असे मला वाटले असं विजयवर्गीय यांनी सांगितले.