मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील मगरोनी चौकी पोलीस स्टेशन अंतर्गत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पनघटा गावातील एका विवाहितेने टॉवरवर चढून प्रियकराला बोलावण्याची मागणी केली. यावेळी महिलेने सुमारे 3 तास गोंधळ घातला. मोठ्या कष्टाने पोलिसांनी तिला खाली उतरवलं. मात्र, महिलेला टॉवरवरून खाली उतरवण्यासाठी पोलिसांना सुरक्षा आणि खबरदारीच्या दृष्टीने बंदोबस्त ठेवावा लागला.
9 सदस्यांच्या टीमने 3 तास प्रयत्न करून महिलेला टॉवरवरून खाली उतरवलं. मिळालेल्या माहितीनुसार, मगरोनी चौकीतील पनघटा गावातील एका विवाहितेने गावातील पॉवर हाऊसच्या टॉवरवर चढून प्रियकराशी पुन्हा भेट घडवून आणण्याची मागणी केली. जर तिच्या प्रियकराला बोलावले नाही तर ती टॉवरवरून खाली येणार नाही असं म्हटलं. पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या समजूतीनंतरही महिला ठाम राहिली.
महिलेने मान्य न केल्याने एसडीआरएफ टीमला पाचारण करावे लागले. ती खाली उतरली तर तिच्या प्रियकराला बोलावले जाईल, असे आश्वासन महिलेला देण्यात आले. या आश्वासनानंतर महिला टॉवरवरून खाली आली. साडेतीन तासांहून अधिक काळ ती महिला टॉवरवर चढून राहिली आणि याचदरम्यान खाली असलेले सर्वजण काळजीत पडले.
नरवर स्टेशन प्रभारी दीपक शर्मा यांनी सांगितले की, महिला टॉवरवर चढली होती. ती तिच्या प्रियकराला बोलावण्याची मागणी करत होती आणि मोठ्या कष्टाने समज देऊन तिला खाली उतरवण्यात आले. ती महिला खूप अस्वस्थ आणि हताश दिसत होती. खूप समजावल्यानंतर ती टॉवरवरून खाली आली. घाई केली असती तर काही अनुचित प्रकार घडू शकला असता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.