मुलांकडून भीक मागून महिलेने ४५ दिवसांत कमावले २.५ लाख; पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 11:20 AM2024-02-14T11:20:04+5:302024-02-14T11:49:27+5:30

इंदौरमधील ४० वर्षीय महिलेने ४५ दिवसांत अडीच लाख रुपये कमावले आहेत.

Woman earns 2.5 lakhs in 45 days by begging; The police made an arrest in madhya pradesh | मुलांकडून भीक मागून महिलेने ४५ दिवसांत कमावले २.५ लाख; पोलिसांनी केली अटक

मुलांकडून भीक मागून महिलेने ४५ दिवसांत कमावले २.५ लाख; पोलिसांनी केली अटक

बालमजुरी हा कायद्याने गुन्हा आहे, मात्र परिस्थिती आणि पोटाची खळगी भरण्यासाठी लहान मुलांवरही काम करण्याची वेळ येते. तर, कधी कधी या चिमुकल्यांच्या आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेत अनेकजण अशा मुलांकडून चुकीच्या पद्धतीने काम करुन घेतात. मध्य प्रदेशात एका महिलेन लहान मुलांना भीक मागायला लावून ४५ दिवसांत अडीच लाख रुपये कमावल्याची घटना समोर आली आहे. इंदौरमधील ही घटना असून ४० वर्षीय महिलेने तिच्याच मुलांना भीक मागायला लावली होती.

इंदौरमधील ४० वर्षीय महिलेने ४५ दिवसांत अडीच लाख रुपये कमावले आहेत. एका एनजीओने यासंदर्भात खुलासा करताना महिलेने तिच्याच मुलांना ४५ दिवस भीक मागायला लावली होती. आपल्या ८ वर्षीय मुलीसह ३ अल्पवयीन मुलांनाही तिने भीक मागायला भाग पाडले. या चौघांनी ४५ दिवस भीक मागून कमावलेली रक्कम ही २.५ लाख आहे. प्रवेश या एनजीओच्या प्रमुख रुपाली जैन यांनी यासंदर्भात माहिती दिली. 

इंदौर शहराला भिक्षुकमुक्त बनवण्यासाठी राज्य सरकारसोबत एकत्रितपणे येऊन काम करणाऱ्या प्रवेश या स्वयंसेवी संस्थेनं याबाबतच खुलासा केला आहे. रुपाली जैन यांनी सांगितले की, इंदौर-उज्जैन रस्त्यावरील लव-कुश चौकात इंद्राबाई (४०) यांना नुकतेच भीक मागताना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्याकडून १९,२०० रुपयांची रोकड मिळाली आहे. तर, गत ४५ दिवसांत या महिलेने २.५ लाख रुपये कमावले असून त्यातील १ लाख रुपये आपल्या सासऱ्यांना पाठवले आहेत. ५० हजार रुपये बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. तर, ५० हजारांची एफडीही केली, अशी माहिती जैन यांनी दिली. 

इंदौरमध्ये भीक मागणाऱ्या १५० सदस्यांच्या ग्रुपची सदस्य असलेल्या या महिलेच्या कुटुंबीयांचे राजस्थानमध्ये दोन मजली घर असून शेतजमीनही आहे. महिलेच्या नावाने तिच्या पतीने दुचाकीही खरेदी केली आहे. विशेष म्हणजे भीक मागितल्यानंतर पतीसोबत ती याच बाईकवर बसून शहरात फिरत असते, असेही जैन यांनी सांगितले. इंद्राबाई यांना ५ मुले असून दोघेजण राजस्थानमध्ये असून ती ३ मुलांसह इंदौरमध्ये भीक मागण्याचं काम करते. यातील ८ वर्षीय मुलीला बालकल्याण समितीच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. 

दरम्यान, भिक्षुक महिलेने तिची विचारपूस करणाऱ्या प्रवेश संस्थेच्या स्वयंसवेकांशी झटापटी व गैरवर्तन केलं होतं. त्यानंतर, याप्रकरणी इंद्राबाई यांना सीआरपीसीच्या कलम १५१ नुसार अटक करण्यात आली आहे. इंदौरमधून आत्तापर्यंत भीक मागणाऱ्या १० बालकांना शासकीय बाल सुधार गृहात पाठवण्यात आले आहे. 
 

Web Title: Woman earns 2.5 lakhs in 45 days by begging; The police made an arrest in madhya pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.