एकीकडे मराठा आरक्षणाचे आंदोलन हिंसक झालेले असताना दुसरीकडे मराठा आंदोलकांनी अजित पवार गटाच्या एका आमदार पुत्राला पुरते हैराण करून सोडले आहे. त्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यावर संतापलेल्या मराठा आंदोलकांनी त्याच्या फोन पेवर १, २, ५ रुपये पाठविण्यास सुरुवात केली. हे मेसेज आणि नोटीफिकेशन येऊन येऊन हा आमदार पूत्र पुरता त्रासला आहे.
राज्यभर फिरत असताना मनोज जरांगे पाटलांची पंढरपूरला देखील सभा झाली होती. या सभेला सोलापूरच्या माढा मतदार संघातील अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांच्या पुत्राने आर्थिक मदत केली होती. याबाबतचे बोलणे व्हायरल झाले आहे. ही मदत बोलून दाखविल्याने मराठा समाजाने वेगळेच आंदोलन सुरु केले आहे. या आमदार पुत्राची जिरविण्याची शक्कल मराठा समाजाच्या लोकांनी शोधली आणि त्याला १,२,३ रुपये पाठविण्यास सुरुवात केली. यासंबंधीचे आवाहन असलेले मेसेज सोशल मीडियावरील ग्रुपवर व्हायरल करण्यात आले होते.
पंढरपूर तालुक्यातील सकल मराठा समाजाकडून रणजितसिंह शिंदे यांना फोन पेवरून हे रुपये पाठविण्यात येत आहेत. रणजितसिंह शिंदे हे सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष आहेत. मालोजी चव्हाण या तरुणाने शिंदे यांना फोनवरून जाब विचारला होता, तेव्हा त्यांनी आपणच जरांगे पाटलांच्या सभेला पैसा पुरविल्याचे शिंदे यांनी म्हटले होते. या संवादाच्या क्लिपवरून आता वेगळीच मोहीम सुरु झाली आहे. याबाबतचे वृत्त टीव्ही९ ने दिले आहे.