चंद्रपूर : रक्कम विड्राॅल करण्यासाठी येथील जिल्हा परिषदेसमोरील चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत गेलेल्या ग्राहकांना सर्व्हर डाऊन झाल्याची बतावणी करीत त्यातील काही रकमेवर डल्ला मारण्याचा प्रताप रोखपालाकडून गेल्या काही महिन्यांपासून सुरू असल्याची खळबळजनक बाब उघड झाली आहे. या रोखपालाने आतापर्यंत १ कोटी १७ लाख रुपयांवर हात साफ केल्याची बाब शुक्रवारी उजेडात आली.निखिल घाटे असे या रोखपालाचे नाव आहे. बँकेत मोठी रक्कम विड्राॅल करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना हेरून त्यांनी विड्राॅल केलेली पूर्ण रक्कम न देता त्यातील काही रक्कम तो स्वत: ठेवून घेत असे. सर्व्हर डाऊन असल्यामुळे पूर्ण रक्कम देता येत नसल्याचे कारण सांगून तसे लिहूनही देत होता. संबंधित ग्राहकांनी अधिकृत तक्रार न केल्यामुळे हा प्रकार बिनधोक सुरूच होता. शुक्रवारी एका सोसायटीने बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. व्ही. पोटे यांच्याकडे तक्रार केली. यानंतर पोटे यांनी सायंकाळी बँक गाठून चौकशी केली असता त्यांना धक्काच बसला. रोखपालाने १ कोटी १७ लाख रुपयांची रक्कम लाटली असल्याची प्राथमिक माहिती चौकशीत पुढे आल्याचे समजते. त्याने ४८ लाख रुपये जमा केल्याचीही माहिती आहे. या प्रकरणाची अंतर्गत चौकशी पोटे करीत असून चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी ‘लोकमत’ला दिली.
रोखपालाने उडवले १ कोटी १७ लाख, चंद्रपूर जिल्हा बँकेत ‘सर्व्हर डाऊन’च्या नावाखाली मारला डल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2021 5:55 AM